Economic News: टीसीएसचा महसूल अपेक्षेपेक्षा कमी, आयडीबीआय बँकेचे खासगीकरण, गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक पाच महिन्याच्या उच्चांकावर….

मुंबई – पहिल्या तिमाहित टीसीएसचा महसूल केवळ 1.3 टक्क्यांनी वाढून 63,437 कोटी रुपये इतका झाला आहे . विश्लेषकांना हा महसूल 64,666 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के कृतीवसन यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर अस्थिरता असल्यामुळे काही प्रमाणात परिणाम झाला आहे.
कंपनीचा नफा 6 टक्क्यांनी वाढून 12,760 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीचा नफा 1.9 टक्क्यांनी वाढून 12,263 कोटी रुपये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. कंपनीने अकरा टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला अजून हा लाभांश चार ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, जागतिक परिस्थिती खराब असलीे तरी कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे. जुन्या ग्राहकांना सेवा कार्यक्षमरीत्या दिली जात असून नवे ग्राहक मिळत आहेत. नव्या तंत्रज्ञानावर आधारित कंपनीच्या सेवा ग्राहकांना पसंत पडत आहेत. एप्रिल- जून या तिमाहीत कंपनीने नव्या 6,071 कर्मचार्यांना कामावर घेतले.
एनव्हीडीयाचे बाजार मूल्य चार लाख कोटी डॉलर
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आघाडीवर असलेली अमेरिकेची एनव्हिडिया कंपनी बाजार मूल्यानुसार आता 4 लाख कोटी डॉलरची झाली आहे. कंपनी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॉमेट नावाचे सर्च इंजिन उपलब्ध करणार आहे.
त्यामुळे काही महिन्यापासून या कंपनीच्या शेअरच्या भावात एकतर्फी वाढ होत आहे. पाच लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त बाजार मूल्य झालेली एनव्हिडिया ही जगातील पहिली कंपनी आहे. विशेष म्हणजे एनव्हिडिया कंपनीचे बाजार मूल्य भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्ना इतके आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या 4.2 लाख कोटी डॉलरची समजली जाते. कंपनीच्या शेअरच्या भावात यावर्षी आतापर्यंत 18% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या कंपनीच्या शेअरच्या भावात 24% वाढ झाली होती. अमेरिकेच्या नॅशडॅक या मुख्य निर्देशांकापेक्षा ही वाढ कितीतरी जास्त आहे. एनव्हिडीयाची स्पर्धक कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बाजार मूल्य 3.7 लाख कोटी डॉलर, तर अॅपल कंपनीचे बाजार मूल्य 3.1 लाख कोटी डॉलर आहे.
राज्यांना तंत्रज्ञान विकासात गुंतवणूक वाढविण्याचा सल्ला
निती आयोगाने राज्य सरकारना राज्य पातळीवरील विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांमध्ये गुंतवणूक वाढविण्याचा सल्ला दिला आहे. या परिषदांचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने व्हावे यासाठी यात बदल करण्याची सूचनाही निती आयोगाने केली आहे.
केंद्र सरकार आणि खासगी उद्योग नाविन्यपूर्णता वाढवून स्टार्टअप संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर राज्य पातळीवरील विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांना बळकट केले तर संबंधित राज्यामध्ये स्टार्ट अप विकसित होण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होईल असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सांगितले.
यासंदर्भात एक तपशिलात अहवाल तयार करण्यात आला असून तो अवलोकनासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांसाठी जर त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 0.5% रक्कम उपलब्ध केली तर त्यामुळे संबंधित राज्यांमध्ये वैज्ञानिक संस्कृती आणि त्या आधारावर उद्योग वाढण्यास मदत होईल असे सांगण्यात आले.
गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक पाच महिन्याच्या उच्चांकावर
विविध देशांदरम्यान चालू असलेले युद्ध, अमेरिकेने सुरू केलेले व्यापार युद्ध आणि शेअर बाजारातील अस्थिरता या कारणामुळे सोन्यातील गुंतवणूक आकर्षक झाली आहे. अशा परिस्थितीत गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक जून महिन्यात वाढून 2,081 कोटी रुपये इतकी झाली आहे.
गेल्या पाच महिन्यांमध्ये या क्षेत्रात एवढी गुंतवणूक प्रथमच झाली आहे. मे महिन्यामध्ये या क्षेत्रात केवळ 292 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर एप्रिल महिन्यात या क्षेत्रात गुंतवणूक होण्याऐवजी सहा कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. मार्च महिन्यामध्ये 77 कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.
ही माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संस्थेने जारी केले आहे. जानेवारी ते जून या कालावधीत गोल्ड ईटीएफमध्ये झालेले गुंतवणूक आता 8 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. मे महिन्यापर्यंत गोल्ड एटीएम अंतर्गत झालेली एकूण गुंतवणूक 62, 453 कोटी रुपये होती. ती वाढून जून महिन्यात 64,777 कोटी रुपये इतकी झाली आहे.
मॉर्निंग स्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडिया या संस्थेच्या वरिष्ठ विश्लेषक नेहल मेश्राम यांनी सांगितले की, आता गोल्ड ईटीएफ पर्यायी गुंतवणूक साधन म्हणून भारतामध्ये लोकप्रिय होऊ लागले आहे. सोन्याच्या किमती वाढत आहेत आणि वाढत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात केलली गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि अधिक परतावा देणारी ठरेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. जून महिन्यात गोल्ड ईटीएफ खात्यांची संख्या 2.75 लाखांनी वाढून 76.54 लाख झाली आहे.
दूरसंचार, आयटी कंपन्यांच्या शेअरची विक्री चालूच
भारत- अमेरिका व्यापार कराराच्या चर्चेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
भारत- अमेरिकेदरम्यान व्यापार करारावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. अशा परिस्थितीत बरेच गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत. लवकरच विविध कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदारांना फार काढून घेत आहेत. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली.
गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 345 अंकांनी कमी होऊन 83,190 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 120 अंकांनी म्हणजे 0.47 टक्क्यांनी कमी होऊन 25,355 अंकावर बंद झाला. शेअर बाजारातील 2,064 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तरी 1,959 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. 138 कंपन्यांच्या शेअरचे भाव स्थिर राहिले. जागतिक बाजारात तेजीचे वातावरण असल्यामुळे निर्देशांकांची जास्त हानी टळली.
रिअॅल्टी, धातू, तेल आणि नैसर्गिक युटेलिटीज क्षेत्र वगळता इतर क्षेत्राच्या निर्देशांकावर नकारात्मक परिणाम झाला. त्यामध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅपचा समावेश होता. जिओजीत इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, बाजार बंद झाल्यानंतर टीसीएस कंपनीचा ताळेबंद जाहीर होणार होता. याबाबत आशावादी नसलेल्या गुंतवणूकदारांनी कालपासूनच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री सुरू केलेली आहे. अमेरिकेतील परिस्थिती अनिश्चित असल्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम होणे अपेक्षित आहे.
एअरटेल, एशियन पेंट्स, इन्फोसिस, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टेक महिंद्रा, इटर्नल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर मारुती, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, ट्रेन्ट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. वाणिज्य मंत्रालयाचे शिष्मंडळ व्यापार करारावरील चर्चेसाठी पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार आहे. अमेरीकेसोबत प्राथमिक स्वरूपाचा करार लवकरच होईल. मात्र या कराराच्या तपसीलाबाबत गुंतवणूकदारांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे एकतर गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत किंवा विक्री करीत आहेत असे वातावरण आहे.
क्षेत्र घट
मिडकॅप 0.28%
स्मॉल कॅप 0.12%
तंत्रज्ञान 1.17%
दूरसंचार 1.11%
माहिती तंत्रज्ञान 0.71%
ग्राहक वस्तू 0.44%
ऑक्टोबरपर्यंत आयडीबीआय बँकेचे खासगीकरण
केंद्र सरकार व एलआयसी 60 टक्के भागभांडवल विकणार
आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकार आणि एलआयसी आपल्याकडील 60 टक्के भागभांडवल विकणार असल्याचे दिसून येत आहे.
यासाठी खासगी क्षेत्राला बोली बोलता येईल आणि त्या आधारावर भांडवल विक्री केली जाणार आहे. गेल्या तीन वर्षापासून ही प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेअंतर्गत केंद्र सरकार आपल्याकडील 30.48% आणि एलआयसी आपल्याकडील 30.24% भाग भांडवल विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. यासाठी आवश्यक माहितीचे संकलन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
बोलीदारांना ही माहिती बोली बोलण्याच्या अगोदर उपलब्ध होईल. रिझर्व बँक आणि गृहमंत्रालयाने आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. गुरुवारी आयडीबीआय बँकेच्या शेअरचा भाव 0.40 टक्क्यांनी कमी 99 रुपये 50 पैसे प्रति शेअर या पातळीवर होता.
एलआयसीची भांडवल विक्री होणार
केंद्र सरकारकडे लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन म्हणजे एलआयसीचे 96.5% इतके भाग भांडवल आहे. या अगोदर केंद्र सरकारने 21,000 कोटी रुपयांना 3.5 टक्के भाग भांडवल मे 2022 मध्ये आयपीओच्या माध्यमातून विकले होते. 16 मे 2017 पर्यंत केंद्र सरकारचा एलआयसीमधील वाटा दहा टक्क्यांनी कमी होण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार शक्य तितक्या लवकर आपल्याकडील एलआयसीचे 6.5 टक्के भाग भांडवल विकण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू करण्याची शक्यता आहे. विक्रिसाठी शेअरची किंमत व शेअरची संख्या लवकरच ठरविली जाईल. सध्या एलआयसीचे बाजार मूल्य 5.85 लाख कोटी रुपये आहे
चीनसारख्या देशावर जास्त विसंबून राहू नका
वाणिज्य मंत्री गोयल यांचा ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना सल्ला
भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी व्हायचे आह.े अशा परिस्थितीत भारताविरोधात नकारात्मक वर्तणूक करणार्या विशिष्ट देशावर सुट्या भागासाठी किंवा इतर आयातीसाठी जास्त अवलंबून राहू नका, अशी सूचना केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना केली आहे.
भारतातील ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी स्टार्टअपच्या मदतीने या क्षेत्रात संशोधन आणि विकासावर भर द्यावा. तसेच या क्षेत्रासाठी आवश्यक कच्च्या मालासाठी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. तरच आपण ऊर्जा क्षेत्रात शाश्वत प्रगती करू शकू असे गोयल म्हणाले. आपल्या पुरवठा साखळीवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.
दोन वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काही सुट्या भागाच्या टंचाईमुळे विविध क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला असल्याचा संदर्भ त्यांनी दिला. आयातीसाठी एकाच देशावर अवलंबून न राहता पर्यायी स्त्रोत तयार ठेवावेत. शक्यतो या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले. चीनने वाहन उद्योगासाठी आवश्यक रेअर अर्थ मॅग्नेटच्या पुरवठ्यावर राजकीय दृष्टिकोनातून मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे भारतातील वाहन उद्योगावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चीनने खताची निर्यात थांबविली आहे. याचाही शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतात सौर ऊर्जा उत्पादन वाढण्यासाठी अमर्याद संधी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील सौर ऊर्जा उत्पादन वाढून 227 गीगा वॅटपर्यंत गेले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या क्षेत्रात स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले तरच भारत स्वावलंबी होऊ शकेल असे ते म्हणाले.
आशियातील देशांबरोबर व्यापार वाढणार
आशिया खंडातील देशाबरोबर व्यापार वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे या देशाबरोबर व्यापारकरार करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असून हे देश भारताला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आशिया खंडातील देशाबरोबर व्यापार कराना सदर्भात एकात्मिक चर्चा चालू असून लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.





