Mock Drill : मॉक ड्रिलसाठी शहरांचे वर्गीकरण; मुंबई-पुणे शहरात अशी असेल परिस्थिती

Mock Drill : – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. भारताकडून कठोर कारवाईची शक्यता आहे. या कारवाईला पाककडून देखील प्रत्युत्तर मिळू शकते.
त्यामुळेच शहरांवर हल्ला झाल्यास, नागरिकांना त्यांचा जीव वाचविता यावा, या उद्देश्याने प्रशिक्षण देण्यासाठी गृहमंत्रालयाच्या वतीने देशभरात मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणाऱ्या ठिकाणांचे तीन श्रेणीत वर्गीकरण केले आहे. अ श्रेणीत देशभरातील १३ शहरे असून यात मुंबई, उरण, तारापूर यांचा समावेश आहे.
ब श्रेणीत देशभरातील तब्बल २०१ शहरे असून यात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धताव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवड यांचा समावेश आहे. तिसऱ्या श्रेणीत छ. संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
संभाव्य धोका लक्षात घेवून केंद्राच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी विषेश तयारी सुरू केली आहे. युद्धाच्या काळात हवाई हल्ल्याचा धोका असताना सायरन वाजवले जातात. तशाच प्रकारे उद्या सायरन वाजवला जाईल.
आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचायचे, ब्लॅकआऊट कसा करायचा, याचे प्रशिक्षण नागरिकांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्य सरकार देखील अलर्ट मोडवर आहे.
राज्य प्रशासनाने सगळ्या संबंधित यंत्रणांना अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांना प्रशासनाशी समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.





