भारताचा परकीय चलनसाठा पोहोचला 690 अब्ज डॉलरवर

मुंबई – नऊ मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठा 4.5 अब्ज डॉलरने वाढून 690. 61 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. या आठवड्यामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर व रोखे बाजारामध्ये बरीच गुंतवणूक केली. त्याचबरोबर या कालावधीत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य वाढले आहे. यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्याच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे विश्लेषकानी सांगितले.
या अगोदरच्या आठवड्यात मात्र भारताकडील परकीय चलन साठा दोन अब्ज डॉलरने कमी झाला होता. सप्टेंबर 2024 मध्ये भारताकडे 704.8 अब्ज डॉलर एवढा परकीय चलन साठा झाला होता. मात्र त्यानंतर व्यापार युद्ध सुरू झाल्यामुळे आणि डॉलर बळकट झाल्यामुळे भारतातील परकीय गुंतवणूक परदेशात गेली.
यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम झाला. रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँकेला बर्याच प्रमाणात डॉलर खर्च करावे लागले. यामुळे नंतर परकीय चलन साठ्यात घट झाली होती. मात्र आता ही झीज भरून निघत असल्याचे दिसून येते.
दरम्यान सरलेल्या आठवड्यामध्ये रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य तब्बल 4.5 अब्ज डॉलरने वाढून 86.33 अब्ज डॉलर या पातळीवर गेले आहे. त्यामुळे या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा वाढण्यास मदत झाली. आता डॉलर कमकुवत पातळीवर असल्यामुळे आगामी काळात भारताकडे येणारी गुंतवणूक वाढून भारताकडील परकीय चलन साठा वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


