भारताचा परकीय चलन साठा एक अब्ज डॉलरने वाढला

मुंबई – रुपयाचे मूल्य घसरत आहे. त्याचबरोबर शेअर बाजारातून परकीय गुंतवणूक परत जात आहे. अशा परिस्थितीत काही थेट परकीय गुंतवणुकीचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. त्याचबरोबर सोन्याच्या दरात वाढ होत आहे. या कारणामुळे 31 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा एक अब्ज डॉलरने वाढून 630.60 अब्ज डॉलर या पातळीवर गेला.
विशेष म्हणजे या अगोदरच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 5.5 अब्ज डॉलरने वाढला होता. त्यामुळे या आघाडीवर काही प्रमाणात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिझर्व बँक रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर वाणिज्य मंत्रालय निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे या आघाडीवर काही प्रमाणात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात तब्बल अर्धा टक्के कपात केल्याबद्दल बरीच परकीय गुंतवणूक शेअर बाजारात आणि भारतीय रोखे बाजारात आली होती. त्यामुळे सप्टेंबर अखेरीस भारताकडील परकीय चलन साठा 704.88 अब्ज डॉलर पर्यंत गेला होता.
मात्र त्यानंतर अमेरिकेतील महागाई वाढल्यामुळे व्याजदर कपातीत अमेरिकेच्या रिझर्व बँकेने हात आखडता घेतला आहे. अमेरिकेच्या नकारात्मक व्यापार धोरणामुळे आणि पतधोरणामुळे डॉलर वधारत आहे. त्याचा परिणाम भारताच्या रुपयावर आणि भारताच्या परकीय चलन साठ्यावर होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
दरम्यानच्या काळामध्ये सोन्याचे मूल्य वाढत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे साठ्याचे मूल्य या आठवड्यामध्ये 1.2 अब्ज डॉलरने वाढून 70.8 अब्ज डॉलर झाले. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्याचे मूल्य वाढण्यास मदत झाली आहे.


