भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात एका आठवड्यात २ अब्ज डॉलरची घट

मुंबई – भारताची निर्यात वाढून आयात कमी झाली आहे. अशा परिस्थितीत भारताची चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच रुपया कमकुवत होऊन डॉलर वधारत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढत आहेत. यामुळे 13 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा दोन अब्ज डॉलरने कमी होऊन 652.8 अब्ज डॉलर या पातळीपर्यंत खाली आला आहे.
या अगोदरच्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठा 3.2 अब्ज डॉलरने कमी झाला होता. गेल्या दोन महिन्यापासून भारतीय परकीय गंगाजळीमध्ये घट होत असल्याचे दिसून येते. रुपयाचे मूल्य सध्या निचांकी पातळीवर आहे. अशा परिस्थितीत रुपयाला आधार देण्यासाठी रिझर्व बँक हस्तक्षेप करत आहे. यासाठी डॉलरचा वापर केला जात आहे. यामुळेही भारताकडील परकीय चलन साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केली होती. त्यानंतर अमेरिकेने दोन वेळा पाव टक्क्याची कपात केली आहे. या कालावधीत डॉलर कमकुवत होऊन भारतीय शेअर बाजारात बरीच गुंतवणूक झाली होती.
त्यामुळे सप्टेंबरमध्ये भारताकडे असलेला परकीय चलन साठा 704.8 अब्ज डॉलर या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर गेला होता. त्यानंतर अमेरिकेतील परिस्थिती बिघडत आहे. आगामी काळात अमेरिका व्याजदरात कपात करणार नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे भारतातील परकीय गुंतवणूक परत जात आहे. दरम्यानच्या काळात सोन्याच्या मूल्यात वाढ होत आहे. त्यामुळे भारताकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या आठवड्यात 1.1 अब्ज डॉलरने वाढून 68 अब्ज डॉलरवर गेले आहे.


