Hardeep Singh Puri : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी दोन दिवसांच्या सरकारी दौर्यासाठी दोहा येथे पोहोचले. त्यांनी कतारचे ऊर्जा व्यवहार राज्यमंत्री आणि कतार एनर्जीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी साद शेरिदा अल-काबी यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी उच्च-स्तरीय सहभाग, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संस्कृती आणि लोकांमधील संबंधांसह दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. या प्रदेशात शांतता आणि स्थिरता लवकर परत येईल आणि भारत आणि कतारमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उर्जा राज्यमंत्री साद शेरिदा अल-काबी यांनी कतार एक विश्वासार्ह ऊर्जा पुरवठादार राहील या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि भारतासोबतचे ऊर्जा संबंध आणि सहकार्य अधिक मजबूत करायला उत्सुक असल्याचे सांगितले. दोन्ही मंत्र्यांनी 8 एप्रिल रोजी मान्य झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचे स्वागत केले. त्यांनी जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्यय लवकर संपवण्याच्या आणि स्थिती पूर्ववत करण्याच्या महत्त्वावर भर दिला. या संदर्भात, जागतिक पुरवठा साखळी सुरळीत राखण्यासाठी नौकानयनाचे अबाधित स्वातंत्र्य आणि जागतिक व्यापाराचा प्रवाह सुरू राहण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. मंत्र्यांनी कतारच्या ऊर्जा व्यवहार राज्यमंत्र्यांचे आदरातिथ्याबद्दल आभार मानले. दोन्ही मंत्र्यांनी येत्या काही आठवड्यांत नियमित संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे.