भारताचा परकीय चलन साठा विक्रमी पातळीकडे

मुंबई – भारताकडे परकीय चलन साठ्यात गेल्या दोन महिन्यापासून वेगाने वाढ होत असून आता परकीय चलन साठा पुन्हा विक्रमी पातळीकडे आगेकूच करीत आहे. (India’s foreign exchange reserves at record levels soon)
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार 15 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 7 अब्ज डॉलरने वाढून 642 अब्ज डॉलरवर गेला आहे. या अगोदर ऑक्टोबर 2021 रोजी भारताकडील परकीय चलन साठा 645 अब्ज डॉलर वर गेला होता. त्यानंतर भारताकडील परकीय चलन साठ्यात बरीच घट झाली होती.
मात्र रिझर्व्ह बँकेने व अर्थ मंत्रालयाने केलेल्या उपाययोजनामुळे भारताकडील परकीय चलन साठा आता वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यापासून भारतात होणार्या थेट परकीय गुंतवणुकीत वाढ होत आहे.
त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जरी भारतीय शेअर बाजारातून काही प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली असली तरी या गुंतवणूकदारांनी भारतातील रोखे बाजारात बरीच गुंतवणूक केली आहे. त्यामुळे परकीय चलनाचा ओघ कायम आहे. दरम्यानच्या काळामध्ये भारताची काही क्षेत्रातील निर्यात वाढत आहे. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यात वाढ होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
आता जागतिक पातळीवर व्याजदर कपातीचे युग सुरू झाले आहे. अमेरिकेने व्याजदरात कपात केल्यानंतर परदेशी गुंतवणूक भारतात मोठ्या प्रमाणात येऊ शकते. अशा परिस्थितीत भारताकडील परकीय चलन साठा आणखी वाढू शकतो आणि रुपयाचे मूल्य यामुळे सुधारण्यास मदत होऊ शकते असे समजले जाऊ लागले आहे.
भारत सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने बर्याच देशाबरोबर रुपयाच्या माध्यमातून व्यापार करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भारताला परकीय चलन वापरण्याची गरज पडत नाही. असाच प्रयोग आगामी काळातही चालू राहणार आहे. भारतात रुपयाचे मूल्य गेल्या तीन वर्षात बरेच स्थिर आहे. त्यामुळे अनेक देशांना रुपयाच्या माध्यमातून भारताबरोबर व्यापार करणे परवडत असल्याचे बर्याच विश्लेषकांनी सांगितले.


