भारताचा परकीय चलन साठा 702.2 अब्ज डॉलरवर; सोन्याच्या मूल्यात 6.1 अब्ज डॉलरची भर

मुंबई – सतरा ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 4.4 अब्ज डॉलरने वाढून 702.2 अब्ज डलर या पातळीवर गेला आहे. संबंधित आठवड्यामध्ये भारताकडील सुवर्ण साठ्याचे मूल्य वाढल्यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकली.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्री कमी केली आहे. त्यामुळेही भारताकडील परकीय चलन साठा वाढण्यास काही प्रमाणात मदत झाली असल्याचे समजले जाते.
गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीचे मूल्य विक्रमे पातळीवर गेले होते. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेकडे असलेल्या सुवर्ण साठ्याचे मूल्य आठवड्यात 6.1 अब्ज डॉलरने वाढून 108.5 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेले आहे. त्यामुळे एकूणच परकीय चलन साठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे.
रिझर्व बँक डॉलरशिवाय युरो, पाउंड, येन इत्यादी चलनात परकीय चलन संकलित करीत असते. संबंधित आठवड्यात विविध चलनाच्या बदलानुसार आठवड्याच्या पातळीवर परकीय चलनाचे मूल्यांकन केले जात असते. या संदर्भातील आकडेवारी रिझर्व बँक प्रकाशित करीत असते. विश्लेषकांनी सांगितले की, परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजार आणि रोखे बाजारात विक्री कमी केली आहे. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा वाढण्यास मदत झाली आहे.


