IND vs AUS 2nd Test : ती गोष्ट मनात राहिली तरच दमदार कामगिरी होईल – रवी शास्त्री

IND vs AUS :- बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव केवळ ३६ धावांमध्ये संपुष्टात आणला होता. याच कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करताना ही मालिका २-१ अशी जिंकली होती. मात्र, २०२० मध्ये ऍडलेडमध्ये झालेला भारताचा पराभव ही जुनी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला याच मैदानावर पराभूत केले होते, ही गोष्ट भारतीय खेळाडूंनाच्या मनात राहिली पाहिजे तरच ते दमदार कामगिरी करू शकतील, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
भारतीय संघ २०२० मध्ये बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला होता. यावेळी ऍडलेड येथील लढतीमध्ये भारतीय संघाने ३६ ही आपली नीचांकी धावसंख्या नोंदविली होती. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्याकडे जबाबदारी होती.
गुरुवारी झालेल्या आयसीसी रिव्ह्यूमध्ये बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, ऍडलेडमध्ये मागे झालेला पराभव उद्यापासून सुरु होणाऱ्या गुलाबी चेंडूच्या कसोटीवर काही परिणाम करेल. मात्र, आपला याच मैदानावर पराभव झाला होता, हे भारतीय खेळाडूंनी आपल्या मनात ठेवणे गरजेचे आहे. गुलाबी चेंडूने अनेक गोष्टी वेगवान होतात. त्यामुळे त्याकडे भारताने जास्त लक्ष्य देणे गरजेचे असल्याचे शास्त्री म्हणाले.
डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम लढतीत दाखल होण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात ४-० असे पराभूत करणे आवश्यक आहे. पाच लढतींच्या या मालिकेत भारताने पर्थ येथील कसोटीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत शुक्रवारपासून दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. या कसोटीत देखील भारताने चमकदार कामगिरी करताना विजयी आगेकूच कायम ठेवणे गरजेचे आहे. मात्र, ही कसोटी गुलाबी चेंडूने दिवस-रात्र प्रकारात खेळली जाणार आहे. त्यामुळे भारतासमोर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.
शास्त्री म्हणाले, एखाद्या सत्रामध्ये काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील किंवा घडणार नाहीत. मात्र तुम्ही गोलंदाजी करत असाल, तर तुम्हाला चांगली संधी असणार आहे. गुलाबी चेंडू हा स्विंगला नेहमीच मदत करतो. तब्बल ४० षटकांच्या खेळानंतर देखील चेंडूला चांगली चकाकी राहाते, अशा वेळी तुम्हाला केवळ चेंडूचा योग्य वापर करायचा आहे, असा सल्ला देखील शास्त्री यांनी बोलताना दिला.
त्या दिवशी फलंदाज दुर्दैवी होते
शास्त्री म्हणाले, भारताचा डाव ३६ धावांमध्ये संपुष्टात आला होता. चेंडू खेळताना बॅटची कड घेवून क्षेत्ररक्षकाकडे जातो. त्या सत्रामध्ये फलंदाज सोडत असलेले चेंडू देखील बॅटची कड घेवून क्षेत्ररक्षकांकडे जात होते. ४० वर्षांपासून मी क्रिकेट पहातो आहे. त्या सत्रामध्ये फलंदाजाने काही जरी केले, तरी चेंडू बॅटची कड घेतच होता. कधी कधी चेंडू बॅटच्या जवळून जातो, मात्र, त्या सत्रात असे काहीच झाले नाही. माझ्या गोलंदाज नेहमीच दुर्दैवी असतात, कारण संधी मिळून देखील त्यांना बळी मिळत नाहीत. मात्र, त्या दिवशी फलंदाज दुर्दैवी होते, असेच म्हणावे लागेल.





