Ravi Shastri Statement : ‘…तर त्याने पॅन्ट काढून हातात दिली असती’, वैभव सूर्यवंशीबाबत रवी शास्त्रींच थेट लाईव्ह शोमध्ये खळबळजनक वक्तव्य
Ravi Shastri Statement : रवी शास्त्री यांनी एका लाईव्ह शोमध्ये अत्यंत भन्नाट आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्रींच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

Ravi Shastri Statement On Vaibhav Sooryavanshi IND vs ENG T20I : भारताचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंडमध्ये प्रचंड चर्चेत आहे. जर वैभवने इंग्लंडविरुद्धच्या चालू टी-२० मालिकेत पदार्पण केले, तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा इतिहासामधील सर्वात तरुण खेळाडू ठरेल. दरम्यान, वैभवला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संताप आहे. याच मुद्द्यावर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी एका लाईव्ह शोमध्ये अत्यंत भन्नाट आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्रींच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.
रवी शास्त्री नेमकं काय म्हणाले?
‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वरील एका जाहीर चर्चेदरम्यान शास्त्रींना विचारण्यात आले की, वैभव सूर्यवंशीला संधी मिळायला हवी का? यावर आपल्या खास शैलीत उत्तर देताना शास्त्री म्हणाले, “अरे, वैभवला आयर्लंडमध्येच खेळवायला हवे होते. तिथली मैदाने लहान होती, त्याने चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर मारले असते. त्याने तिथे आयर्लंडची पॅन्ट काढून हातात दिली असती. आता इथे इंग्लंडमध्ये त्याला खेळवतील की नाही, देव जाणे!” शास्त्रींच्या या विधानातील ‘पॅन्ट काढून हातात देणे’ हा शब्दशः अर्थ नसून, प्रतिस्पर्ध्याची जोरदार धुलाई करून त्यांच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवणे, असा होतो.
“Arrey, woh khelna chahiye tha yaar!” 👀
Ravi Shastri’s brutally honest take on Vaibhav Sooryavanshi 💬
Watch #ENGvIND, 2nd T20I on 4th July, 6 PM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels.#SonySportsNetwork #MamlaPersonalHai #ExtraaaInnings pic.twitter.com/0S9yMguEig
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 1, 2026
१५ वर्षांच्या मुलाला कशाचीही भीती नाही –
वैभवच्या आयपीएल २०२६ मधील तडाखेबंद कामगिरीचे कौतुक करताना शास्त्री पुढे म्हणाले, “त्याला जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर भारतीय संघात संधी द्या. आयपीएलमध्ये त्याने जगातील मोठ्या वेगवान गोलंदाजांची धुलाई केली आहे. अशा मॅचविनरला तुम्ही फक्त बेंचवर बसवून ठेवत आहात. तो फक्त १५ वर्षांचा आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणताही मानसिक दबाव किंवा भीती नाही. जर त्याने सुरुवातीलाच आक्रमक सुरुवात केली, तर संघ व्यवस्थापनाला त्याला कायमचे संघात ठेवावे लागेल.”
पदार्पणाची प्रतीक्षा संपणार?
आयर्लंड दौऱ्यावरील दोन्ही सामन्यांत वैभवला डावलून सूर्यांश शेडगे आणि प्रिन्स यादव यांना संधी दिली गेली होती, जिथे भारताचा ०-२ असा पराभव झाला. आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही वैभवला स्थान मिळाले नाही, तर दुसरीकडे सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यामुळे सॅमसनच्या फ्लॉप शो नंतर आता आगामी सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय कॅप मिळण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.





