पापुआ न्यू गिनीला भारताची १० लाख डॉलरची मदत

नवी दिल्ली – विनाशकारी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पापुआ न्यू गिनीला पुनर्वसन आणि पुनर्बांधणीच्या कामात मदत म्हणून भारताने १० लाख डॉलरची तात्काळ मदत जाहीर केली आहे. पापुआ न्यू गिनीच्या एन्गा प्रांतात २४ मे रोजी एक प्रचंड भूस्खलन झाले. त्यामुळे शेकडो लोक गाडले गेले आहेत आणि मोठी जीवितहानी झाली आहे.
किमान ६७० जण गाडले गेले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र ही संख्या यापेक्षा तिप्पटीने जास्त म्हणजे २ हजार असावी, असा सुधारीत अंदाज नुकताच पुढे आला आहे. त्यामुळे भारताकडून ही मदत जाहीर करण्यात आली.
पापुआ न्यू गिनीमध्ये भीषण भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. भारत पीडित कुटुंबांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे मोदी ययांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. भारत सर्व शक्य सहकार्य आणि मदत करण्यास तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांचे म्हणणे आहे की शुक्रवारी पापुआ न्यू गिनीच्या पर्वतीय भागात यांबाली गावाला भूस्खलनाचा फटका बसला असून दगड, माती आणि झाडचांमुळे हा भाग मोठ्या प्रमाणात प्रमाणात अस्थिर होत असल्याने सुमारे ८ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची आवश्यकता असू शकते. मदतीसाठी लष्कराच्या उत्खनन पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय इंजिनिअर देखील तेथे मदतीचे प्रयत्न करत आहेत.





