Indian Womens Team : महाकालेश्वराच्या चरणी भारतीय महिला क्रिकेट संघ, विश्वचषक विजयासाठी प्रार्थना, पाहा VIDEO

Indian Women’s Team Video : एकदिवसीय महिला विश्वचषक 2025 मध्ये सहभागी असलेला भारतीय संघ बुधवारी सकाळी आस्था आणि अध्यात्माची नगरी उज्जैन येथील विश्वविख्यात बाबा महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्यासह संघातील अनेक खेळाडूंनी पहाटे होणाऱ्या भस्म आरतीत सहभाग घेतला. खेळाडू पूर्ण भक्तिभावात लीन होऊन पूजा-अर्चनेत दिसले. यावेळी त्यांनी नंदी हॉलमध्ये बसून भगवान शिवाचा आशीर्वाद घेतला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी भारतीय संघाने महाकालच्या दरबारात आगामी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वचषक जिंकण्यासाठी प्रार्थना केली.
विश्वचषकातील भारताची कामगिरी –
भारतीय संघ सध्या चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकून गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना डकवर्थ-लुईस नियमांनुसार 59 धावांनी जिंकला, तर पाकिस्तानविरुद्ध 88 धावांनी विजय मिळवला. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धचे पुढील दोन सामने अनुक्रमे 3-3 गडी राखून गमावले. आता भारतीय संघ 19 ऑक्टोबर रोजी इंदौरच्या होळकर स्टेडियमवर विश्वचषक 2025 चा 20 वा सामना खेळणार आहे. यानंतर 23 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीत न्यूझीलंडविरुद्ध आणि 28 ऑक्टोबर रोजी त्याच मैदानावर बांगलादेशविरुद्ध लढणार आहे.
Ujjain, Madhya Pradesh: Ahead of their World Cup match against England, the Indian women’s cricket team visited Ujjain’s Mahakaleshwar Temple, seeking Lord Shiva’s blessings pic.twitter.com/ciyohzyyxl
— IANS (@ians_india) October 15, 2025
भारताची फलंदाज प्रतिका रावल हिने चार सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 180 धावा केल्या असून, ती भारताची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. ऋचा घोष हिने 4 डावात 54.33 च्या सरासरीने 163 धावा, हरलीन देओलने 145, तर स्मृती मंधानाने 134 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत दीप्ती शर्माने चार सामन्यांमध्ये 22.78 च्या सरासरीने 9 गडी घेतले असून, ती भारताची सर्वोच्च गोलंदाज आहे. क्रांति गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 6 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – IND vs WI: टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं समीकरण कसं आहे?
सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारताला इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे सर्व गट सामने जिंकावे लागतील. केवळ सामने जिंकणे पुरेसे ठरणार नाही, तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यापैकी किमान एका संघाने एक सामना गमावावा, अशी अपेक्षा भारताला करावी लागेल. याशिवाय, भारताला त्यांचा निव्वळ धावगती (NRR) मजबूत ठेवावा लागेल, जेणेकरून गुण समान झाल्यास भारताला फायदा होईल. विशेषत: न्यूझीलंडविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, जो क्वार्टर-फायनलसारखा ठरेल. जो संघ हा सामना जिंकेल, त्याच्या सेमीफायनलच्या आशा कायम राहतील.





