Pune District : अंतराळ संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांची मोठी झेप
Pune District : या संशोधनाचा आणखी एक रंजक पैलू म्हणजे रेडिओ दीर्घिकेचे पुनःसक्रिय होणे. कृष्णविवरातून बाहेर पडणारी ऊर्जेची जेट काही काळानंतर मंदावतात.

आळेफाटा : अंतराळाच्या अथांग विश्वातील अनेक रहस्ये उलगडण्याच्या दिशेने भारतीय शास्त्रज्ञांनी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर-पुणे) तसेच राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए-टीआयएफआर) येथील संशोधकांनी तब्बल 28 लाख प्रकाशवर्षे विस्तार असलेल्या महाकाय ‘एस’ आकाराच्या रेडिओ दीर्घिकेचा शोध लावला आहे. या संशोधनासाठी जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (जीएमआरटी) महत्त्वपूर्ण उपयोग करण्यात आला आहे.
या संशोधनामुळे कृष्णविवरांची कार्यपद्धती आणि दीर्घिकांच्या निर्मितीपासून त्यांच्या पुनःसक्रिय होण्यापर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांना नवी दिशा मिळाली आहे. या शोधाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे संबंधित दीर्घिकेमध्ये कृष्णविवरातून ऊर्जा बाहेर फेकणार्या जेट उत्सर्जनाचे तब्बल चार स्वतंत्र टप्पे आढळले आहेत. आतापर्यंत अशा प्रकारच्या दीर्घिकांमध्ये तीन सक्रिय टप्प्यांचे पुरावे आढळले होते. मात्र, चार वेगवेगळ्या टप्प्यांत जेट उत्सर्जन झाल्याचे पुरावे मिळाल्याने हा शोध खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
या संशोधनाचा आणखी एक रंजक पैलू म्हणजे रेडिओ दीर्घिकेचे पुनःसक्रिय होणे. कृष्णविवरातून बाहेर पडणारी ऊर्जेची जेट काही काळानंतर मंदावतात. त्यांची ऊर्जा कमी झाल्याने रेडिओ उत्सर्जनही हळूहळू घटते. मात्र, कृष्णविवर पुन्हा सक्रिय झाल्यानंतर नव्याने जेट बाहेर पडू लागतात आणि दीर्घिकेत पुन्हा ऊर्जा निर्माण होते. या प्रक्रियेची तुलना राखेतून पुन्हा जन्म घेणार्या ‘फिनिक्स’ पक्ष्याशी केली जाते. त्यामुळे अशा दीर्घिकांना विश्वातील पुनर्जन्माची अनोखी उदाहरणे मानले जाते. नव्या संशोधनामुळे कृष्णविवर कधी सक्रिय होते, कधी शांत होते आणि पुन्हा कशा प्रकारे कार्यरत होते, याचा अधिक सखोल अभ्यास करता येणार आहे.
जीएमआरटीची जागतिक संशोधनात महत्त्वाची भूमिका
या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी जुन्नर तालुक्यातील खोडद येथे उभारण्यात आलेल्या जगप्रसिद्ध जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (जीएमआरटी) वापर करण्यात आला. पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. याशिवाय अमेरिकेतील व्हेरी लार्ज अॅरे (व्हीएलए) आणि दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट या अत्याधुनिक रेडिओ दुर्बिणींच्या निरीक्षणांचाही संशोधनासाठी उपयोग करण्यात आला. वेगवेगळ्या रेडिओ वारंवारतांवरील माहिती एकत्र करून दीर्घिकेची रचना, जेटचे वय आणि त्यांची ऊर्जा यांचा अभ्यास करण्यात आला.
या संशोधनात प्रा. पवन खाडेकर, प्रा. धरमवीर लाल, प्रा. रमणा आत्रेय यांच्यासह संशोधकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संशोधनाचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झाला आहे.
विश्वाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी नवी संधी
महाकाय रेडिओ दीर्घिकेतील चार स्वतंत्र जेट उत्सर्जनांचे पुरावे म्हणजे केवळ एका नव्या दीर्घिकेचा शोध नाही, तर कृष्णविवरांच्या दीर्घकालीन हालचाली समजून घेण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या या संशोधनामुळे विश्वातील दीर्घिकांची निर्मिती, त्यांची उत्क्रांती आणि त्यांच्यात वेळोवेळी होणारे बदल यांचा अभ्यास अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. विशेष म्हणजे, जुन्नर तालुक्यातील खोडद येथील दुर्बिणीने जागतिक स्तरावरील या संशोधनात बजावलेली भूमिका जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.





