Indian Killed : इराणच्या हल्ल्यात भारतीय खलाशी ठार, अन्य १० जण जखमी
इराणने मंगळवारी होर्मूझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या दोन टँकरवर क्रूझ क्षेपणास्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये भारताचा एक खलाशी मरण पावला असून अन्य १० जण जखमी झाले आहेत.

इराणने केलेल्या हल्ल्याची दखल घेऊन भारताने इराणच्या उप-राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये पाचारण केले आणि या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. इराणने अशाप्रकारचे हल्ले तात्काळ थांबवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
माउंट अल बहिया आणि माउंट मोम्बासा या संयुक्त अरब अमिरातीच्या दोन तेलवाहक जहाजांमधून मिळून एकूण ४६ खलाशी होते. त्यात ३० भारतीय होते.
एमटी अल बहिया जहाजावरील १२ भारतीय नागरिकांपैकी एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. तर एमटी मोम्बासा जहाजावरील १८ भारतीय नागरिकांपैकी नऊ जण जखमी झाले असून, त्यांपैकी दोघे गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.
इराणने या दोन्ही जहाजांवर केलेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी हिंसेचा मार्ग सोडून द्यावा आणि चर्चेला पुन्हा सुरुवात करावी, असे आवाहन देखील भारताच्यावतीने करण्यात आले आहे.
या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्याप्रती तीव्र सहवेदना परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.
संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावास परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत असून संबंधित भारतीय खलाशांना आवश्यक ती मदत पुरवण्यात येत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या पश्चिम आशियाई संघर्षात आतापर्यंत १४ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.





