Samay Raina : समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा पुन्हा मोठा दणका.! 10 लाखांचा दंड ठोठावला, नेमकं प्रकरण काय? वाचा….
दिव्यांग व्यक्ती आणि स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त मुलांबाबत आक्षेपार्ह विनोद केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला पुन्हा एकदा कडक शब्दांत फटकारलं आहे.

Samay Raina : वादग्रस्त स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. दिव्यांग व्यक्ती आणि स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त मुलांबाबत आक्षेपार्ह विनोद केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला पुन्हा एकदा कडक शब्दांत फटकारलं आहे. न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आणि आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने त्याच्यावर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
एवढंच नाही, तर निर्धारित मुदतीत दंडाची रक्कम जमा न केल्यास त्याच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही न्यायालयाने दिला आहे. सोशल मीडियावर स्वतःला ‘युथ आयकॉन’ म्हणून सादर करणाऱ्या समय रैनाच्या भूमिकेवरही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. (Samay Raina)
न्यायालयाची तीव्र नाराजी; “उत्तर इतक्या उशिरा का?”
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी समय रैनाने दाखल केलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. “हे बाजूला ठेवा,” अशी प्रतिक्रिया देत त्यांनी उत्तरातील दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं सांगितलं जात आहे. न्यायालयाने समय रैनाने चुकीची माहिती देत न्यायालयाची दिशाभूल केल्याचाही उल्लेख केला.
दिव्यांगांच्या सन्मानाचा प्रश्न (Samay Raina)
या प्रकरणात न्यायालयाने नियुक्त केलेल्या अमिकस क्युरी अपराजिता सिंह यांनी न्यायालयात स्पष्ट केलं की, याचिकाकर्त्यांचा उद्देश कोणाकडून नुकसानभरपाई मिळवणं नसून दिव्यांगांच्या सन्मानाचं रक्षण करणं हा आहे. त्यांच्या मते, सार्वजनिक व्यासपीठावर दिव्यांग व्यक्ती आणि गंभीर आजारांनी ग्रस्त मुलांची खिल्ली उडवणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादेबाहेरचं कृत्य आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोवरून वाद
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि इतर काही इन्फ्लुएन्सर्स यांनी दिव्यांग मुले आणि व्यक्तींवर आक्षेपार्ह विनोद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने संबंधितांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, दोन आठवड्यांच्या आत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षी समय रैनाच्या शोमध्ये स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती तसेच दिव्यांग मुलांवर केलेल्या विनोदांमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठी चर्चा झाली आणि वाढत्या दबावानंतर समय रैना व शोमधील इतर कलाकारांना सार्वजनिक माफी मागावी लागली होती.
न्यायालयाचा आदेशही पाळला नाही?
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी समय रैनाला एसएमएग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी निधी उभारण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सुनावणीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशानंतरही त्याने एसएमए फाउंडेशनशी किंवा संबंधित रुग्णांशी कोणताही संपर्क साधला नाही.
एसएमए फाउंडेशनचा गंभीर आरोप
एसएमए फाउंडेशनच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की, “तो स्वतःला ‘युथ आयकॉन’ म्हणवतो, पण न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याबाबत कोणतीही गंभीरता दाखवत नाही. तो सातत्याने कार्यक्रम करत आहे, मात्र एसएमएग्रस्त मुलांसाठी कोणतीही ठोस मदत किंवा पुढाकार घेतलेला नाही.”
न्यायालयाचे स्पष्ट निर्देश
या सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने समय रैनावर 10 लाख रुपयांचा दंड कायम ठेवत तो निर्धारित कालावधीत जमा करण्याचे आदेश दिले. तसेच न्यायालयाच्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास पुढील सुनावणीत त्याच्याविरोधात अधिक कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता न्यायालयाने स्पष्ट केली आहे.







