Thailand : थायलंडमधील बारमध्ये लागलेल्या आगीत किमान २७ मृत्यू तर, २२ जणांची प्रकृती चिंताजनक
थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका बारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये किमान २७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि डझनभर जण जखमी झाले आहेत.

Thailand : थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका बारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये किमान २७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि डझनभर जण जखमी झाले आहेत. ही आग अग्निशामक दलाच्या पथकाने नंतर आटोक्यात आणली. बँकॉकच्या उत्तरेकडील ना लादप्राओ बीअर हॉल या बारमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर ही आग लागली होती.
अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणायला सुमारे अर्धा तास लागला.आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे नेमके कारण पुर्ण तपासानंतरच समजू शकले, असे बँकॉकचे गव्हर्नर चादचार्ट सित्तीपंत यांनी सांगितले.
रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीमुळे काळ्या धुराचे लोट हवेत उंच उठत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे. सोमवारी सकाळपर्यंत या परिसराची पुर्ण नाकाबंदी करण्यात आली होती. घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचे पथक देखील हजर झाले होते.
बारमधील फर्निचर, टिव्ही, स्पीकर आणि इलेक्ट्रीक गिटारसारख्या अन्य उपकरणांची राखरांगोळी झाल्याचे दिसून आले. आगीत जखमी झालेल्या ६३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी २२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांपैकी अनेकांजवळ ओळख पटवण्यासाठी कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ओळख पटवण्यात अडचण येते आहे.
आगीची प्राथमिक माहिती बारमधील गायिकेकडून :
बारमध्ये गीत गात असलेल्या एका गायिकेला स्टेजजवळच्या सर्किट ब्रेकरमधून धूर येत असल्याचे सर्वप्रथम जाणवले. त्यानंतर अचानक लाईट गेली आणि स्फोटासारखा आवाज ऐकू आला. थोड्याचवेळात संपूर्ण बारमध्ये दाट काळा धूर पसरला, असे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी सांगितले.
मरण पावलेले अनेकजण बारच्या मागच्या बाजूच्या विश्रामकक्षामध्ये आढळून आले. आगीमध्ये मरण पावलेल्याबद्दल प्रार्थना करण्यासाठी बौद्ध भिक्खूंचे पथक देखील घटनास्थळी आले होते.
२०२२ मध्ये देशाच्या पूर्व भागातील एका म्युझिक बारमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. तर दशकभरापुर्वी १ जानेवारी २००९ रोजी नववर्षाच्या पार्टीमध्ये लागलेल्या आगीत ६६ जणांचा मृत्यू झाला होता आणि २०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.





