भारतीय कंपन्यावर पुन्हा आरोपाची शक्यता

नवी दिल्ली – फेब्रुवारी 2022 मध्ये अमेरिकेतील हिंडेनबर्ग समूहाने भारतातील अदानी समूहातील कंपन्यावर गैरप्रकारचे आरोप केले होते. त्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे बाजार मूल्य तब्बल दीडशे अब्ज डॉलरने कमी झाले होते. आता आगामी समूहाने बरीच धावपळ करून स्वतःची प्रतिमा उजळ केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या बाजार मूल्यात बरीच सुधारणा झाली असली तरी आता जॉर्ज सोरोस या अमेरिकेतील बलाढ्य उद्योगपतीच्या गटाकडून काही भारतीय कंपन्यावर पुन्हा गैरव्यवहाराचे आरोप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सोरोस आणि त्यांच्या काही पाठीराख्यांनी ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतातील काही कंपन्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. जॉर्ज सोरोस यांनी ओपन सोसायटी फाऊंडेशन स्थापन केलेले आहे. यामध्ये रॉकफेलर ब्रदर्स फंड या अमेरिकेतील संस्थेचाही समावेश आहे.
या संदर्भात काही वृत्त माध्यमांना सुगावा लागला असून लवकरच भारतीय कंपन्या विरोधात नकारात्मक माहिती बाहेर काढली जाण्याची शक्यता आहे. या संस्थेची 2006 मध्ये स्थापना करण्यात आली असून जगभरातील माध्यमांशी त्यांचा समन्वय असतो. वेळोवेळी या माध्यमाच्या माध्यमातून बातम्या जाहीर केल्या जात असतात. भारतातील कंपन्यामध्ये परदेशी गुंतवणूक अयोग्य प्रकारे कशाप्रकारे केली जात आहे या संदर्भात ही माहिती असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
भारतातील कोणती कंपनी किंवा कोणत्या कंपन्यांसंदर्भात ही माहिती जारी होणार आहे या संदर्भात माहिती मिळालेली नाही. मात्र भारतातील गुंतवणूकदार याबाबत सावध असल्याचे समजले जाते. गेल्या वर्षी हिंडेनबर्ग समूहाने अदानी समूहातील कंपन्या शेअरच्या किमती वाढवण्यासाठी देशात आणि परदेशात कसे गैरव्यवहार करतात यासंदर्भात माहिती दिली होती. हे सर्व आरोप अदानी समूहाने फेटाळले आहेत.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ञ समितीने अदानी समूहाने गैरप्रकार केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर लवकरच बाजार नियंत्रक सेबी यासंदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अशा प्रकारच्या नकारात्मक बातम्या येण्याअगोदर शेअर बाजारात विशिष्ट प्रकारचे व्यवहार केले जातात. या व्यवहाराकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे समजले जाते. हिंडेनबर्ग समूहाने आरोप केल्यानंतर स्वतः जॉर्ज सोरस यांनी एका व्यासपीठावर गौतम अदानी यांचा उद्योग समूह कमकुवत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कमकुवत होईल असे म्हटले होते. त्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कठोर टीका केली होती.





