विशाखापट्टणम – आंध्र किनारपट्टीवर गस्तीवर असलेल्या वीरा या भारतीय तटरक्षक जहाजाने नऊ मच्छिमारांना वाचवले. दिनांक ५ एप्रिल रोजी बोटीला आग लागल्याने हे मच्छिमार गंभीर जखमी झाले होते. आगीनंतर या बोटीला जलसमाधी मिळाली होती. आयसीजीएस वीरा ला विशाखापट्टणम बंदरापासून सुमारे ६५ सागरी मैल अंतरावर असलेल्या भारतीय मासेमारी नौका दुर्गा भवानीला आग लागल्याचा जवळच्या मासेमारी बोटीकडून रेडिओ संदेश मिळाला होता. दुर्गा भवानी ही आंध्र नोंदणीकृत बोट २६ मार्च रोजी काकीनाडा बंदरातून नऊ कर्मचाऱ्यांसह निघाली होती. दिनांक ५ एप्रिल रोजी बोटीला आग लागल्याने जहाजावरील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. सर्व नऊ मच्छिमारांनी जीव वाचण्यासाठी पाण्यात उडी मारली परंतु काहींना गंभीर दुखापत झाली. स्फोटामुळे नुकसान झालेली मासेमारी बोट काही मिनिटांतच बुडाली. आग आणि स्फोटाची माहिती जवळच्या बोटीद्वारे तटरक्षक दलाच्या जहाजाला देण्यात आली होती. परिस्थितीची निकड ओळखून आयसीजीएस वीरा वेगाने निघाली आणि काही तासांतच त्या ठिकाणी पोहोचली. सर्व नऊ जणांना तटरक्षक दलाच्या जहाजात हलवण्यात आले तिथे वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार केले. दरम्यान, तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्रमांक 6 ने जेडी फिशरीज विशाखापट्टणम यांच्या समन्वयाने जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिकांची तातडीने व्यवस्था केली. सर्व जखमी मच्छिमारांना पुढील उपचारासाठी विशाखापट्टणम येथील किंग जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले.