इंडिया युथ फ्रंटची ८ जुलैला निदर्शने; नीट घोळाचा करणार निषेध

नवी दिल्ली – नीट परीक्षेतील घोळाविरोधात आवाज उठवण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी संलग्न असणाऱ्या युवकांच्या शाखा एकवटल्या आहेत. त्यातून इंडिया युथ फ्रंटची स्थापना करण्यात आली आहे. आता ती संघटना ८ जुलैला दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात निदर्शने करणार आहे.
युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत संबंधित निदर्शनांची माहिती दिली. केंद्र सरकार नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, काही विद्यार्थी संघटनांनी बुधवारीही जंतर-मंतर परिसरात निदर्शने केली. आंदोलकांनी केंद्र सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी मंगळवारी संसदेच्या दिशेने मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले. काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यातही घेण्यात आले. इंडिया अगेन्स्ट एनटीए या बॅनरखाली विद्यार्थी संघटना एकवटल्या आहेत. एनटीए ही संस्था बंद करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आदी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.





