‘इंडियाचा अंतर्गत विरोधामुळे दारूण पराभव होईल’ – भाजप

नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील अंतर्गत विरोध ठळकपणे दिसून येत आहे. त्यामुळे त्या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव होईल, असा दावा भाजपने मंगळवारी केला. इंडिया आघाडीतील घटक पक्ष पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये एकमेकांविरोधात लढत आहेत. त्या आघाडीने १ जूनला बैठक बोलावली आहे.
मात्र, तृणमूल कॉंग्रेसने बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यातून इंडियामधील मतभेद, विसंगती उघड होत आहेत. साहजिकच, त्या आघाडीच्या घटक पक्षांना दिली जाणारी मतं वाया जाणार आहेत.
त्यामुळे मतदारांनी सुज्ञपणे कृती करावी, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत केले. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता समाप्तीच्या मार्गावर आहे.
देशाची जनता भाजपच्या पाठिशी निर्णायकपणे उभी राहिल्याचे मतदानाच्या सहा टप्प्यांतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने कूच केले आहे.
इंडिया आघाडीचा पराभव निश्चित असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसरा कार्यकाळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





