US-Israel-Iran War : भारताकडून युद्धविरामाचे स्वागत.! परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका
या युद्धविरामाचे भारताने स्वागत करत पश्चिम आशियामध्ये शाश्वत शांतता सुनिश्चित करण्यासाठी तणाव कमी करणे, संवाद आणि मुत्सद्देगिरी यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

US-Israel-Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी इराणसोबत युद्धविराम करण्यास सहमती दर्शवल्याचे जाहीर केले.
या युद्धविरामाचे भारताने स्वागत करत पश्चिम आशियामध्ये शाश्वत शांतता सुनिश्चित करण्यासाठी तणाव कमी करणे, संवाद आणि मुत्सद्देगिरी यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्ही या युद्धविरामाचे स्वागत करतो आणि आशा करतो की यामुळे पश्चिम आशियामध्ये शाश्वत शांतता प्रस्थापित होईल. सध्या सुरू असलेला संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात आणूण तणाव कमी करणे, संवाद आणि मुत्सद्देगिरी हे घटक अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका भारताने मांडली आहे.
या संघर्षामुळे लोकांचे अतोनात हाल होत आहेत, तसेच जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार नेटवर्कमध्येही व्यत्यय निर्माण झाला आहे. आम्ही अशी अपेक्षा करतो की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जागतिक दळण-वळण सुरळीतपणे सुरू राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिका इराणला मदत करेल !
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी अमेरिका इराणला मदत करेल. युद्धाच्या सुरुवातीपासूनच इराणने होर्मुझवर नाकेबंदी लादली होती, ज्यामुळे सर्व सागरी वाहतुकीवर निर्बंध आले होते.
मात्र, नंतर इराणने स्पष्ट केले की होर्मुझची सामुद्रधुनी त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी नेहमीच खुली आहे, परंतु त्यांच्या शत्रू राष्ट्रांसाठी पूर्णपणे बंद आहे. यामुळे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला मोठा दिलासा दिला आहे.
त्यांनी तेहरानला एक मोठे खोटे आश्वासन दिले आहे की, इराण आता युद्धात नुकसान झालेल्या आपल्या पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी सुरू करू शकतो.






