India vs South Africa T20: डी कॉकच्या वादळी खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेचा भारतावर 51 धावांनी विजय

प्रभात वृत्तसेवा
मुल्लानपूर (न्यू चंदीगड) – सलामीवीर क्विंटन डी कॉकने केलेल्या वादळी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताला ५१ धावांनी नमवत ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आफ्रिकेने दिलेल्या २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १९.१ षटकांत सर्वबाद १६२ धावांवर मर्यादित राहिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर शुभमन गिल खातेही न उघडता माघारी परतला, त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवही झटपट बाद झाले आणि भारताची अवस्था ३ बाद ३२ धावा अशी झाली. त्यानंतर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या गड्यासाठी ३५ धावांची भागीदारी केली.
अक्षर बाद झाल्यावर तिलकने आपले अर्धशतक पूर्ण करत हार्दिकसोबत ५१ धावांची भागीदारी रचली. २० धावांची संथ खेळी करून हार्दिक बाद झाला, तेव्हा ३४ चेंडूत ९६ धावांची गरज होती. तिलक वर्मा आणि जितेश शर्मा यांनी झुंज देत भारताचा विजय लांबवला, परंतु भारताचा डाव १९.१ षटकांत सर्वबाद १६२ धावांवर मर्यादित राहिला. तिलकने ३४ चेंडूत ६२ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, भारताने प्रथम नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीचे निमंत्रण दिले. पहिले ४ चेंडू निर्धाव खेळल्यानंतर खणखणीत षटकार मारत क्विंटन डी कॉकने आक्रमकता दाखवायला सुरुवात केली. ५ व्या षटकात वरुण चक्रवर्तीने रीझा हेंड्रिक्सला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. आफ्रिकेच्या सलामीजोडीने ३८ धावांची भागीदारी केली, या भागीदारीत ३० धावांचे योगदान डी कॉकचे होते.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार एडन मार्करमने सावध सुरुवात केली. डी कॉकने मात्र आपली आक्रमक फटकेबाजी चालू ठेवत २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डी कॉकने मार्करमसोबत दुसऱ्या गड्यासाठी ४७ चेंडूत ८३ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीत मार्करमने २६ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले.
मार्करम बाद झाल्यावर डी कॉक आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात ३५ धावांची भागीदारी झाली. चांगल्या लयीत खेळणाऱ्या डी कॉकला वरुण चक्रवर्तीने यष्टीरक्षक जितेश शर्माच्या हातून धावबाद करत पुनरागमन केले. डी कॉकने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी साकारली.
त्यानंतर पुढच्याच षटकात अक्षरच्या चेंडूवर तिलक वर्माने अप्रतिम झेल घेत ब्रेविसलाही बाद केले. त्यानंतर शेवटच्या ३ षटकांत डोनोव्हान फरेरा आणि डेव्हिड मिलर यांनी कोणतीही पडझड होऊ न देता ४९ धावा जोडत आफ्रिकेला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. आफ्रिकेने निर्धारित २० षटकांत ४ बाद २१३ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून चक्रवर्तीने २ तर अक्षर पटेलने १ गडी बाद केला.
अर्शदीपच्या नावे अनोखा विक्रम
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. सामन्याच्या ११ व्या षटकात अर्शदीप गोलंदाजीला आला असताना त्याने त्या एकाच षटकात ७ वाइड चेंडू टाकले. भारतीय गोलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक वाइड चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला आहे.
याआधी हा विक्रम मोहम्मद शामीच्या (५ वाइड) नावे होता. अर्शदीपने ११ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर ७ वाइड चेंडूंसह १८ धावा दिल्या. या सामन्यात अर्शदीपने त्याच्या ४ षटकांत १३.५० च्या इकॉनॉमीने ५४ धावा (एकूण ९ वाइड) देत सर्वात महागडा गोलंदाज ठरला.





