IND vs NZ 3rd Test (Day 1 Stumps) : – तीन कसोटीच्या या मालिकेत न्यूझीलंड संघाने बंगळुरू व पुणे कसोटी जिंकताना मालिका आधीच खिशात टाकली आहे. मात्र क्लीन स्वीप टाळण्यासाठी ही कसोटी जिंकणे भारतासाठी आवश्यक आहे. पहिल्याच दिवशी न्यूझीलंड संघाला 235 धावांमध्ये झटपट बाद केल्यानंतर भारताच्या फलंदाजानी पुन्हा एकदा हाराकिरी केली. दिवसअखेर भारताने 4 बाद 86 अशी सुरुवात केली. रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेली भेदक गोलंदाजी हेच तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. न्यूझीलंडकडे पहिल्या डावातील अजून 149 धावांची आघाडी शिल्लक आहे.
न्यूझीलंडचा डाव 235 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल चांगली सुरुवात देतील असे वाटले होते. मात्र रोहित शर्मा सातव्याच षटकांत मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर फसला. त्याने 18 चेंडूत 18 धावांची खेळी केली. यशस्वी व शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी एजाज पटेलचा चेंडूवर यशस्वी चकला व चेंडूने थेट यष्टींचा वेध घेतला. यशस्वीने 31 धावांची खेळी केली.
भारताचे 10 चेंडूत 3 फलंदाज तंबूत
यशस्वी 17 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर परतला. त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून आलेल्या मोहम्मद सिराज पहिल्याच चेंडूवर एजाजच्या फिरकीच्या जाळयात अडकला. लेग स्टॅम्पवरून वळून चेंडू थेट सिराजच्या पॅडला लागला, आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अपील करताच पंचानी बाद दिले. सिराज 17 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. यामुळे विराट कोहलीला मैदानात उतरावे लागले.
तंबूतून सेट होऊन आल्यासारखा कोहलीने एक सुंदर चौकार मारला. मात्र त्याला चोरटी धाव घेण्याचा मोह टाळता आला नाही. मिडऑनला ढकललेल्या चेंडूवर धाव घेण्यासाठी सुरुवात केली. मॅट हेन्रीने चेंडू उचलून केलेला थ्रो थेट यष्टींवर लागला. यावेळी कोहली क्रिजपासून बराच लांब राहिला. कोहली 18 व्या षटकांच्या तिसऱ्या चेंडूवर तंबूत परतला. 2 बाद 78 वरून भारताची अवस्था 4 बाद 86 अशी झाली. दिवसअखेर शुभमन गिल 31 तर ऋषभ पंत एका धावेवर नाबाद राहिले.
न्यूझीलंडची खराब सुरुवात..
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. आकाशदीपने सलामीवीर डेव्होन कॉन्व्हेला (4) पायचीत पकडले. सलामीवीर व कर्णधार टॉम लॅथमने विल यंग सोबत दुसऱ्या गडयासाठी 44 धावांची भागीदारी केली. सुंदरच्या फिरकीवर कर्णधार लॅथम फसला व चेंडू थेट यष्टीवर आदळला. लॅथम 28 धावा करून परतला. यानंतर आलेल्या रचिन रवींद्रला देखील सुंदरने बोल्ड करताना मालिकेत तिसऱ्यांदा तंबूचा रस्ता दाखविला.
सुंदर आणि जडेजाची फिरकी
रचिन बाद झाल्यानंतर यंगने डॅरिल मिशेलसोबत चौथ्या गड्यासाठी 87 धावांची भागीदारी केली. यादरम्यान यंगने कसोटी कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी रवींद्र जडेजाने मोडली. जडेजाने किवी संघाच्या डावाच्या 44व्या षटकांत दोन गडी बाद केले. प्रथम यंगला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर टॉम ब्लंडेल याला क्लीन बोल्ड केलं. यंगने 71 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी ब्लंडेलला खातेही उघडता आले नाही. यानंतर जडेजाने ग्लेन फिलिप्सलाही क्लीन बोल्ड केले. त्याने 17 धावांचे योगदान दिले. जडेजाने न्यूझीलंडच्या 61व्या षटकांत ईश सोधी (7) आणि मॅट हेन्री (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर उर्वरित काम वॉशिंग्टन सुंदरने केले. त्याने डॅरिल मिशेल (82) आणि एजाज पटेल यांना बाद करून न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच आणि वॉशिंग्टन सुंदरने चार विकेट घेतल्या. याशिवाय आकाश दीपने एक बळी मिळविला.
जडेजाचा विक्रम…
अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमढये सर्वाधिक बळी घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज ठरला. जडेजाने झहीर खान व इशांत शर्मा (दोघेही 311 बळी) यांना पाठीमागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून अनिल कुंबळेने 619 बळी टिपले असून तो अव्वल स्थानी आहे. त्यानंतर रविचंद्रन अश्विन (553) दुसऱ्या तर कपिल देव 434 बळींसह तिसऱ्या स्थानी आहेत. हरभजनसिंगने 417 बळी घेताना चौथे स्थान राखले असून त्यानंतर जडेजाचा नंबर लागतो. रवींद्र जडेजाने ७७ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. आजच्या कामगिरीसह रवींद्र जडेजाची 314 बळी झाले आहेत.
Stumps on the opening day of the Third Test in Mumbai.#TeamIndia move to 86/4 in the 1st innings, trail by 149 runs.
See you tomorrow for Day 2 action
Scorecard – https://t.co/KNIvTEyxU7#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ppQj8ZBGzz
— BCCI (@BCCI) November 1, 2024
संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड : पहिला डाव : 65.4 षटकांत सर्वबाद 235 : डॅरिल मिशेल 82, विल यंग 71, टॉम लॅथम 28, ग्लेन फिलिप 17, रवींद्र जडेजा 22-1-65-5, वॉशिंग्टन सुंदर 18.4-2-81-4, आकाश दीप 5-0-22-1.
भारत : पहिला डाव : पहिला दिवस अखेर : 19 षटकांत 4 बाद 86 : यशस्वी जैस्वाल 30, रोहित शर्मा 18 शुभमन गिल नाबाद 31, मोहम्मद सिराज 0, विराट कोहली 4, ऋषभ पंत नाबाद 1, एजाज पटेल 7-1-33-2, मॅट हेन्री 5-1-15-1.