IND vs AUS 1st Test : दुसऱ्या दिवस अखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत, यशस्वी शतकाच्या उंबरठ्यावर तर राहुलचेही दमदार अर्धशतक…

IND vs AUS 1st Test Day 2 Stumps :– पहिल्या डावात झटपट बाद झालेल्या भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीत जबरदस्त बाऊंस बॅक करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात बिनबाद १७२ धावा केल्या. दुसऱ्या डावात धावांसाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्याबरोबरीने यशस्वी जैस्वालने लौकिकास साजेशी कामगिरी करताना दमदार अर्धशतक झळकावले. दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची आघाडी मिळाली आहे.
That’s Stumps on Day 2 of the first #AUSvIND Test!
A mighty batting performance from #TeamIndia! 💪 💪
9⃣0⃣* for Yashasvi Jaiswal
6⃣2⃣* for KL RahulWe will be back tomorrow for Day 3 action! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/gTqS3UPruo pic.twitter.com/JA2APCmCjx
— BCCI (@BCCI) November 23, 2024
पहिल्या दिवशी भारताचा डाव ४९.४ षटकांत १५० धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४१ धावांची तर यष्टिरक्षक ऋषभ पंतने ३७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने भेदक गोलंदाजी करताना ४ तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व मिचेल मार्शने प्रत्येकी २ गडी बाद केले होते. भारताचा डाव कोसळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव देखील भारतीय गोलंदाजानी झटपट गुंडाळला.
ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली. घरच्या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सहा फलंदाजानी केवळ ३७ धावांचे योगदान दिले. ही दुसऱ्या क्रमांकांची सर्वात कमी धावसंख्या होती. १९७८ मध्ये ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सहा फलंदाजानी २२ धावांचे योगदान दिले होते. जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करताना पहिल्याच दिवशी ४ गडी बाद केले. हर्षित राणाने ३ तर मोहम्मद सिराजने २ गडी बाद करताना पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियायाची अवस्था २७ षटकांत ७ बाद ६७ केली होती.
ऑस्ट्रेलियाचे शेपूट वळवळले…
भारताने ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात २७ षटकांत ७ बाद ६७ अशी अवस्था केली होती. यष्टीरक्षक अलेक्स कॅरी, नॅथन लायन व मिचेल स्टार्क यांनी २७ व्या षटकापासून ५१ व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाचा डाव लांबवला. तब्बल २२ षटके ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर झुंज दिली. मिचेल स्टार्क तब्बल ११२ चेंडू खेळपट्ट्टीवर उभा राहिला. त्याने २३.२१ च्या स्ट्राईक रेटने २६ धावांची खेळी केली. जी या डावातील ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक होती. अखेर हर्षित राणाने स्टार्कचाअडसर दूर करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ५१.२ षटकांत १०४ धावांमध्ये संपुष्टात आणला. भारताकडून जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्यांदा ५ बळी टिपण्याची कामगिरी केली. हर्षित राणाने ३ तर जसप्रीत बुमराहने २ गडी बाद केले.
यशस्वी – राहुल जोडी जमली
पहिल्या डावात भारताला ४६ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने दुसरा डाव सुरु केला. दुसऱ्या डावात भारताच्या सलामीवीरांनी तब्बल ५७ षटकांमध्ये बिनबाद १७२ धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीमध्ये यशस्वी जैस्वालने १९३ चेंडूचा सामना करताना ७ चौकार व २ शतकारांच्या सहाह्याने नाबाद ९० धावांची खेळी केली. धावासाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलने दुसऱ्या डावात १५३ चेंडूत केवळ ४ चौकार मारताना नाबाद ६२ धावांची खेळी केली. भारताच्या सलामीवीरांना बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने तब्बल ७ गोलंदाजांचा वापर केला. मात्र एकाही गोलंदाजाला दिवसभरात यश मिळाले नाही.
चुकांमधून शिकले…
लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल पहिल्या डावात झटपट बाद झाले होते. पहिल्या डावात यशस्वीला भोपळा देखील फोडता आला नाही. तर राहुलने २६ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना मागील डावात झालेल्या चुका टाळल्या. राहुलने संयम राखताना खेळपट्टीवर स्थिरावण्यास भरपूर वेळ घेतला. सुरुवातीपासून पायांची हालचाल ठेवली, त्यामुळे चेंडूपर्यंत जाण्यास त्याला मदत मिळाली. खराब चेंडूवर जोरादार प्रहार देखील केले. दोघांनी दोघांनी मिळवून दुसऱ्या दिवशी ११ चौकार व २ षटकार लागले. सुरुवातीची चेंडूची चकाकी गेल्यानंतर दोघांनी धावांचा वेग थोडासा वाढवताना संघाला पावणे २०० धावांचा टप्प्यापर्यंत आणून ठेवले.
IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलिया 104 वर गारद, पहिल्या डावानंतर भारताकडे 46 धावांची आघाडी…
संक्षिप्त धावफलक :
भारत : पहिला डाव : ४९.४ षटकांत सर्व बाद १५०
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ५१.२ षटकांत सर्व बाद १०४ : उस्मान ख्वाजा ८, नॅथन मॅकस्विनी १०, मार्नस लॅबुशेन २, ट्रेव्हिस हेड ११, मिचेल मार्श ६, अलेक्स कॅरी २१, पॅट कमिन्स ३, मिचेल स्टार्क २६, नॅथन लॉयन ५, जोश हेझलवूड नाबाद ७, जसप्रीत बुमराह ५-३०, हर्षित राणा ३-४८, मोहम्मद सिराज २-२०.
भारत : दुसरा डाव : ५७ षटकांत बिनबाद १७२ : यशस्वी जैस्वाल नाबाद ९० (७ चौकार, २ षटकार), लोकेश राहुल नाबाद ६२ (४ चौकार).
लक्षवेधी…
– १९८१ मध्ये मेलबर्न नंतर पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध घराच्या मैदानावर दुसरी सर्वात कमी धावसंख्या
– १९८५ पासून घराच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाची तिसरी सर्वात कमी धावसंख्या
– १९७८ मध्ये ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या सहा फलंदाजांनी २२ धावा केल्या होत्या. त्यानंतर चालू कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सहा फलंदाजानी ३७ धावा केल्या.
– जसप्रीत बुमराहसाठी आशिया बाहेरील कसोटीमध्ये ९ बळी घेताना कपिल देव यांच्याशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियामध्ये बुमराहने दुसऱ्यांदा ५ बळी घेण्याची कामगिरी केली. त्याने इंग्लंड व वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी २ वेळेस तर दक्षिण आफ्रिकेत ३ वेळेस पाच बळी घेतले आहेत.
– पर्थमध्ये बूमराहची सर्वोत्तम गोलंदाजी. बुमराहने ३० धावांमध्ये ५ बळी टिपले. १९८५ साली ॲडलेड कसोटीत कपिल देवने ऑस्ट्रेलियामध्ये १०६ धावांत ८ बळी घेतले होते.
– २००७ च्या मेलबर्न कसोटीमध्ये अनिल कुंबळे नंतर पाच बळी घेणारा बुमराह हा पहिला भारतीय कर्णधार आहे.





