IND vs AUS 1st Test 2nd Day Live Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी पर्थमध्ये खेळवली जात आहे. ही पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे कारण यापैकी एक संघ मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करेल.
भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 104 धावांत गुंडाळले आहे. तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव 150 धावांवर आटोपला होता. आता ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 104 धावसंख्येवर गारद केल्यानंतर भारताने 46 धावांची आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2 चौकारांच्या मदतीने 26 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाने 79 धावांत 9 विकेट गमावल्या होत्या. इथून ऑस्ट्रेलियाला 100 धावांचा टप्पा गाठता येणार नाही असे वाटत होते, पण स्टार्क आणि हेझलवूडने शानदार फलंदाजी करत संघाला तीन अंकी धावसंख्येपर्यंत नेले.
या कालावधीत जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक 5 बळी घेतले. याशिवाय हर्षित राणाने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले.या काळात बुमराहने 10 षटकात 17 धावा दिल्या. सिराजने 9 षटकांत 17 धावा तर हर्षितने 8 षटकांत 33 धावा दिल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 150 धावांत ऑलआऊट झाला. यावेळी संघाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.ऑस्ट्रेलियासाठी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने या डावात सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय मिचेल मार्श, मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्सने प्रत्येकी 2 बळी घेतले.