India-US trade deal: व्यापार कराराच्या घोषणेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय ; ‘या’ ४ भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवली
India-US trade deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील शुल्क विवादानंतर संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत.

India-US trade deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील शुल्क विवादानंतर संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. दोन्ही देशांमधील करारासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने चार भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवली आहे.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ज्या कंपन्यांवरील बंदी उठवली आहे, त्यांमध्ये हैदराबादस्थित आरआरजी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि लोकेश मशीन्स लिमिटेड, अहमदाबादस्थित गॅलेक्सी बेअरिंग्ज लिमिटेड आणि दिल्लीस्थित शौर्य एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
या कंपन्या SDN यादीतून वगळल्या (India-US trade deal)
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने या कंपन्यांना ‘स्पेशली डेझिग्नेटेड नॅशनल्स’ (SDN) यादीतून वगळले आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या कंपन्या आणि व्यक्तींची मालमत्ता अमेरिकेच्या अधिकारक्षेत्रात गोठवली जाते.
दोन वर्षांपूर्वी २१ भारतीय संस्थांवर बंदी घालण्यात आली होती (India-US trade deal)
अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोल’ (OFAC) च्या निर्बंध यादीत चार कंपन्यांचा समावेश झाल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे. २०२४ मध्ये, OFAC ने एका कार्यकारी आदेशानुसार १९ कंपन्या आणि दोन व्यक्तींसह २१ भारतीय संस्थांवर निर्बंध लादले होते. हा आदेश रशियन सरकारला मदत केल्याचा आरोप असलेल्या कंपन्या किंवा व्यक्तींना लक्ष्य करतो.






