युक्रेन शांतता परिषदेत भारत सहभागी होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले….

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात होणाऱ्या जी-७ बैठक आणि युक्रेन शांतता शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. याचा संदर्भ देत ते म्हणाले की, जागतिक शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या अजेंडाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व महत्त्वाच्या शिखर परिषदेत भारत सहभागी होईल.
एका मुलाखतीत मोदी म्हणाले की, जागतिक संवादाला आकार देण्यासाठी आणि मानव-केंद्रित विकास, समृद्धी आणि शांततामय जगाच्या दृष्टीला पुढे नेण्यासाठी या शिखर परिषदेत भारत ग्लोबल साउथचा आवाज असेल.
या परिषदेतील भारताचा सहभाग सक्रीय असेल, असे सांगून मोदी म्हणाले की, परिषदेत जो निर्णय होईल, त्याच्याशी वचनबद्ध राहण्याचा भारताचा प्रयत्न राहील दिनांक १३ ते १५ जून या काळात इटली जी-७ बैठकीचे आयोजन करत आहे, तर स्वित्झर्लंड १५ ते १६ जून दरम्यान युक्रेन शांतता परिषदेचे आयोजन करणार आहे.
शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताला दिलेले निमंत्रण हे त्याचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील योगदान दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले. हे वसुधैव कुटुंबकम (जग एक कुटुंब आहे) या आमच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने आमची मजबूत जागतिक प्रतिबद्धता दर्शवते. जागतिक शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या अजेंड्याला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व महत्त्वाच्या शिखर परिषदांमध्ये भारत सहभागी होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सध्या भारतात सार्वत्रिक निवडणुका सुरु असून ४ जूननंतर केंद्रात कोणते नवे सरकार येईल, याचा आत्ता कोणालाच अंदाज देता येत नाही. मात्र, विद्यमान आणि भावी पंतप्रधान या नात्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने पंतप्रधान मोदींना जी-७ सह युक्रेन युद्ध परिषदेचे निमंत्रण पाठवले आहे.





