Donald Trump : भारत ‘टॅरिफ’मुक्त.! अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
या निर्णयामुळे रशियासह भारत आणि चीनला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारत रशियन कच्च्या तेलाची आयात सध्याच्या पातळीच्या आसपास कायम ठेवण्याची शक्यता आहे.

Donald Trump – रशियन कच्च्या तेलाच्या प्रमुख खरेदीदारांवर नवीन कायद्यांतर्गत लादले जाणारे निर्बंध आणि टॅरिफ शिथिल करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या निर्णयामुळे रशियासह भारत आणि चीनला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारत रशियन कच्च्या तेलाची आयात सध्याच्या पातळीच्या आसपास कायम ठेवण्याची शक्यता आहे.
शनिवारी जारी केलेल्या एका कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण अॅक्ट २०२६ मधील एका तरतुदीचा वापर केला, जी अमेरिकेच्या अध्यक्षांना राष्ट्रीय – हितासाठी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार देते. या निर्णयाचा आधार स्पष्ट करणारे आवश्यक प्रमाणपत्र आणि अहवाल आपण संसदेला सादर केला असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
या आदेशानुसार कायद्याच्या कलम ११२ आणि ११३ अंतर्गत असणारे शुल्क, कलम १०२ (डी) अंतर्गत असणारे निर्बंध आणि परदेशी व्यक्ती व संस्थांवरील इतर अनेक निर्बंध तात्पुरते उठवण्यात आले आहेत. ट्रम्प किंवा परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) जोपर्यंत पुढील कारवाई आवश्यक असल्याचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत हे निर्बंध शिथिल राहतील.
डोनॉल्ड ट्रम्प यांनी रशियाविरुद्धचे अनेक निर्बंध, अटी आणि सीमाशुल्क (ड्युटीज) तूर्तास शिथिल केले आहेत. युक्रेनवरील आक्रमणावरून मॉस्कोवर दबाव वाढवण्यासाठी लागू केलेल्या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच त्यांनी हे पाऊल उचललं. आगामी ३ नोव्हेंबरच्या मध्यवर्ती निवडणुकांपूर्वी अमेरिकेतील डिझेलचे गगनाला भिडलेले दर कमी करणे आणि रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या भारतासारख्या देशांवरील दबाव कमी करणे, हा यामागील प्रशासनाचा मुख्य हेतू आहे.
दरम्यान, हा निर्णय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निश्चित केलेल्या ३० दिवसांची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी घेण्यात आला. या कायद्यावर ट्रम्प यांनी १८ सप्टेंबर रोजी स्वाक्षरी केली होती. या कायद्यात रशियन कच्च्या तेल आणि वायूच्या पाच सर्वात मोठ्या आयातदारांच्या वस्तूंवर १०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ आकारण्याची आणि रशियाच्या शॅडो फ्लीटवर निर्बंध लादण्याची तरतूद होती.





