Dasara Melava 2026 : शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार ! दसरा मेळाव्यासाठी महानगरपालिकेची परवानगी
शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही गट परवानगीसाठी प्रयत्न करत होते. मात्र यंदा पुन्हा एकदा ठाकरे गटाला परवानगी मिळाल्याने शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच घुमणार हे निश्चित झाले आहे.

Dasara Melava 2026 – बृहन्मुंबई महानगरपालिकेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दसरा मेळाव्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरेसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.
खासदार अनिल देसाई यांनी केलेल्या अर्जानंतर पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी ही परवानगी दिली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही गट परवानगीसाठी प्रयत्न करत होते. मात्र यंदा पुन्हा एकदा ठाकरे गटाला परवानगी मिळाल्याने शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच घुमणार हे निश्चित झाले आहे.
पालिकेच्या पत्रानुसार, 20 ऑक्टोबर रोजी मुख्य दसरा मेळाव्यासाठी आणि 19 ऑक्टोबर रोजी पूर्वतयारीसाठी, अशी 2 दिवसांची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी पालिकेने काही कठोर अटी घातल्या आहेत. मैदानाच्या वापरासाठी प्रतिदिन 500 रुपये + 18% जीएसटी आणि 250 रुपये परवाना शुल्क भरावे लागणार आहे. 20 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
हायकोर्टाच्या आदेशानुसार रात्री 10 नंतर कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही, मैदानावर वाहनांना प्रवेश नाही, ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावे लागतील, कार्यक्रमानंतर मैदान पूर्ववत करून द्यावे लागेल आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त करून पुढील वर्षी परवानगी नाकारली जाईल.
कोणत्याही कारणाने पालिकेने परवानगी रद्द केल्यास कोणताही दावा/भरपाई मागता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका आणि इतर आदेशानुसार मैदान हे सायलेन्स झोन आहे, त्याचे पालन करणे बंधनकारक असेल. रात्री 10.00 नंतर कोणत्याही प्रकारे लाऊडस्पीकर/ध्वनिवर्धक वापरता येणार नाही.
बेकायदेशीर बांधकामास, कोणतेही पक्के बांधकाम, स्टेजसाठी खोदकाम करता येणार नाही. जाहिरात/बॅनर लावायचे असल्यास जाहिरात विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आयोजकाची राहील. प
रिस्थिती बिघडल्यास परवानगी तात्काळ रद्द केली जाईल, अशा अनेक अटी या मेळाव्यासाठी घातल्या आहेत. ही परवानगी केवळ मैदान वापरण्यापुरती आहे, इतर कोणत्याही परवान्याचा यात समावेश नाही, असा इशाराही दिला आहे.





