पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच १४ जानेवारीपासून अंडर-१९ महिला विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळातील अंडर-१९ महिला विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेसाठी अखिल भारतीय महिला निवड समितीकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या निवडीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय महिला संघाची सलामीची धडाकेबाज फलंदाज शेफाली वर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकच्या पहिल्या फेरीत १६ संघांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. हा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत होणारा असून १४ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान खेळवला जाणार आहे. विश्वचषकासाठी टीम इंडियाला ड गटात स्थान देण्यात आले आहे. भारतासह या गटात दक्षिण आफ्रिका, यूएई आणि स्कॉटलंड संघाचा सहभाग असणार आहे.
प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ हे सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील, या संघांना सहा जणांच्या दोन गटात ठेवले जाईल. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. स्पर्धेतील उपांत्य सामने २७ जानेवारी रोजी जेबी मार्क्स ओव्हल येथे खेळवले जातील. त्यांनतर याच मैदानावर २९ जानेवारीला स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अंडर-19 द्विपक्षीय मालिका वेळापत्रक
पहिला T20 सामना – 27 डिसेंबर
दुसरा T20 सामना – 29 डिसेंबर
तिसरा T20 सामना – 31 डिसेंबर
चौथा T20 सामना – 2 जानेवारी
पाचवा T20 सामना – 4 जानेवारी
मालिकेसाठी भारतीय संघ – शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, तीतास साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री.
अंडर-19 टी-20 विश्वचषकसाठी भारतीय संघ
शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, तीतस साधू, फलक नाझ, शबनम एमडी.