India Post: आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची कटकट संपली! इंडिया पोस्टने सुरू केली ‘ही’ भन्नाट सेवा
India Post: लघु उद्योग, ऑनलाइन विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ व प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी टपाल विभागाचे मोठे पाऊल.

India Post – ग्राहकांना अधिक सुलभ, जलद आणि दर्जेदार टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इंडिया पोस्टच्या पिंपरी-चिंचवड येथे टपाल क्षेत्रामार्फत ‘रिटेल पार्सल पिक-अप सेवा आपल्या दारी’ या नव्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेचे उद्घाटन पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते व डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस अभिजीत बनसोडे व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
या नव्या सुविधेमुळे किरकोळ ग्राहकांना पार्सल पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. ग्राहकांच्या विनंतीनुसार इंडिया पोस्टचे कर्मचारी त्यांच्या घर, कार्यालय किंवा व्यावसायिक आस्थापनातून पार्सल स्वीकारून त्याची नोंदणी करतील आणि ते देशातील कोणत्याही ठिकाणी सुरक्षित व विश्वासार्ह पद्धतीने पाठवतील.
ही सुविधा आजपासून शहरातील संबंधित टपाल कार्यालयांमार्फत सुरू झाली असून पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महापालिका हद्दीतील नागरिकांना फोन किंवा व्हॉट्सअपद्वारे सेवा उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी 8421372317 (पिंपरी-चिंचवड व परिसर) क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे.
“इंडिया पोस्ट ग्राहककेंद्रित सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून ही सेवा ग्राहकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचविणारी ठरेल. बदलत्या काळातील गरजा लक्षात घेऊन आधुनिक व नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देत आहोत.”
– प्रीती अग्रवाल, पोस्टमास्तर जनरल
“ही सेवा विशेषतः किरकोळ व्यापारी, लघु व मध्यम उद्योग, ऑनलाइन विक्रेते, महिला उद्योजक, स्वयंरोजगार करणारे नागरिक तसेच नियमित पार्सल पाठविणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”
– अभिजीत बनसोडे, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस




