Satwiksairaj Chirag Withdraw : सात्विक-चिरागला दुखापतीचा फटका! आशिया चॅम्पियनशिपमधून घेतली माघार; लक्ष्य-सिंधूवर मदार
Satwiksairaj Chirag Withdraw : भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Satwiksairaj Chirag withdraw from Asia Championships : बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप २०२६ सुरू होण्यापूर्वीच भारतीय क्रीडाप्रेमींसाठी एक मोठी आणि काहीशी निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
गतविजेत्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला सात्विकच्या खांद्याच्या दुखापतीमुळे आशिया चॅम्पियनशिप २०२६ मधून नाव मागे घ्यावे लागले आहे. सात्विकला अजूनही वेदना होत असल्याने प्रशिक्षकांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या जोडीने २०२३ मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.
लक्ष्य आणि सिंधूवर मदार –
आता भारताच्या नजरा एकेरी प्रकारातील खेळाडूंवर टिकल्या आहेत. १९६५ मध्ये दिनेश खन्ना यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, त्यानंतर तब्बल ६१ वर्षांपासून भारताला एकेरीत सुवर्णपदकाची प्रतीक्षा आहे. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता ठरलेला लक्ष्य सेन हा आपला पहिला सामना हाँगकाँगच्या ली चेउक यिउ विरुद्ध खेळणार आहे.
दुसरीकडे, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू प्रदीर्घ काळानंतर मैदानात परतत आहे. दुबईतील युद्धजन्य परिस्थितीमुळे तिला काही स्पर्धांना मुकावे लागले होते. आता तिचा पहिला सामना मलेशियाच्या वोंग लिंग चिंग विरुद्ध होणार आहे.
इतर खेळाडूंचे आव्हान –
पुरुषांच्या एकेरीत एचएस प्रणॉय दुखापतीनंतर पुनरागमन करत असून त्याची लढत पात्रता फेरीतील खेळाडूशी होईल. अनुभवी किदांबी श्रीकांतची गाठ सिंगापूरच्या लोह कीन यूशी पडणार आहे. महिला एकेरीत मालविका बन्सोड आणि उन्नती हुडा देखील आपले नशीब आजमावतील. दुहेरी प्रकारात अश्विनी भट-शिखा गौतम आणि त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोड्यांकडूनही पदकाच्या अपेक्षा आहेत.





