CD Gopinath Death : भारतीय क्रिकेटचा एक सुवर्ण साक्षीदार हरपला! १९५२ च्या ऐतिहासिक विजयाचे नायक सी.डी. गोपीनाथ यांचं निधन
CD Gopinath Death : भारताचे सर्वात ज्येष्ठ कसोटी क्रिकेटपटू सी.डी. गोपीनाथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले आहे.

India’s oldest Test cricketer CD Gopinath Death : आयपीएल २०२६ चा उत्साह सुरू असतानाच भारतीय क्रिकेटसाठी एक धक्कादायक बातमी आली आहे. भारताचे सर्वात वयस्कर कसोटी खेळाडू सी.डी. गोपीनाथ यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी चेन्नईत अखेरचा श्वास घेतला. गोपीनाथ हे भारताने मिळवलेल्या पहिल्या कसोटी विजयातील (१९५२ – विरुद्ध इंग्लंड) टीम इंडियाचे शेवटचे हयात सदस्य होते. त्यांच्या निधनानंतर आता ९५ वर्षीय चंद्रकांत पटणकर हे भारताचे सर्वात ज्येष्ठ जिवंत कसोटी क्रिकेटपटू ठरले आहेत.
ऐतिहासिक विजयात मोलाचे योगदान –
१ मार्च १९३० रोजी जन्मलेल्या सी.डी. गोपीनाथ यांनी १९५१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर कसोटी पदार्पण केले होते. १९५२ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडला पराभूत करून भारताने आपला पहिला कसोटी विजय नोंदवला होता, त्या सामन्यात गोपीनाथ यांनी ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण ३५ धावा केल्या होत्या.
View this post on Instagram
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ‘किंग’ –
गोपीनाथ यांनी भारतासाठी ८ कसोटी सामन्यांत २४२ धावा केल्या, ज्यामध्ये पदार्पणाच्या सामन्यातील नाबाद ५० ही त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा मोठा होता. त्यांनी मद्रास (आताचे तामिळनाडू) कडून ८३ सामन्यांत ४२.१६ च्या सरासरीने ४२५९ धावा कुटल्या. १९५४-५५ च्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये त्यांनी झळकावलेल्या शतकामुळे मद्रासने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते.
त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एका ऐतिहासिक युगाचा अंत झाला असून, बीसीसीआयसह अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.





