Axar Patel Speech : डेव्हिड मिलरचा ‘तो’ षटकार अन् न घेतलेली धाव! दिल्लीच्या पराभवानंतर अक्षर पटेलने जिंकली मनं, पाहा VIDEO
Axar Patel Speech : सामन्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने आपल्या खेळाडूंना धीर देत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.

Axar Patel Post Match Speech GT vs DC : आयपीएल २०२६ मधील आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. गुजरात टायटन्सने (GT) केवळ १ धावेने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) पराभव केला. हातात आलेला सामना निसटल्यामुळे दिल्लीचे खेळाडू कमालीचे निराश झाले होते, मात्र अशा कठीण प्रसंगी कर्णधार अक्षर पटेलने आपल्या खेळाडूंना धीर देत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. यासह त्याने आपल्या सहकाऱ्यांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला.
अक्षर पटेल ड्रेसिंग रुममध्ये काय म्हणाला?
We keep smiling 😄💙 pic.twitter.com/DWdyihcmzA
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 9, 2026
ड्रेसिंग रुममध्ये संवाद साधताना कर्णधार अक्षर पटेल म्हणाला, “हंगामाच्या सुरुवातीलाच मी सांगितले होते की, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भावनांवर नियंत्रण ठेवायचे आहे आणि शांत राहायचे आहे. आपण सर्वजण दुखी आहोत, पण ठीक आहे, आपण स्मितहास्य करू शकतो. ही एक मोठी स्पर्धा आहे. जर मिलरने ते षटकार मारले नसते, तर आपण सामन्यातच नसतो. आता आपण चेन्नईला जाऊ आणि नव्याने सुरुवात करू.”
अखेरच्या षटकाचा थरार आणि मिलरची ‘ती’ चूक –
Backing our Tiger, always 🫂💙 pic.twitter.com/pAFouiVmVH
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 9, 2026
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१० धावांचे डोंगरासारखे लक्ष्य दिले होते. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १३ धावांची गरज होती आणि चेंडू प्रसिध कृष्णाच्या हातात होता. पहिल्याच चेंडूवर विप्राज निगमने चौकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या, पण दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवने एक धाव काढून स्ट्राईक डेव्हिड मिलरला दिली.
शेवटच्या ३ चेंडूंवर हव्या होत्या ८ धावा –
शेवटच्या ३ चेंडूंवर ८ धावा हव्या असताना मिलरने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. आता २ चेंडूंवर केवळ २ धावांची गरज होती. मात्र, पाचव्या चेंडूवर मिलरने धाव (Single) घेण्यास नकार दिला आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. शेवटचा चेंडू मिलरला खेळता आला नाही आणि बाईची धाव घेण्याच्या नादात कुलदीप यादव धावबाद झाला. यामुळे दिल्लीचा विजय अवघ्या १ धावेने हुकला.गुजरात टायटन्सचा या हंगामातील हा पहिला विजय ठरला, तर दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला पराभव आहे. दिल्लीचा संघ आता हा पराभव विसरून ११ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) भिडण्यासाठी सज्ज होणार आहे.





