India Hockey Win : हरमनप्रीतच्या स्टिकची जादू! वेल्सला ३-१ ने लोळवत टीम इंडियाची स्वातंत्र्यदिनी विजयी सुरुवात
India Hockey Win : वेल्सविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात भारताने ३-१ असा एकतर्फी विजय मिळवत देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट दिली.

India Men Hockey World Cup 2026 Wales 3-1 Win Harmanpreet Singh : १५ ऑगस्टच्या ऐतिहासिक आणि अभिमानाच्या क्षणी भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी विश्वचषक २०२६ (FIH Hockey World Cup 2026) मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे. वेल्सविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात भारताने ३-१ असा एकतर्फी विजय मिळवत देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट दिली. पहिल्याच क्वार्टरपासून आक्रमक खेळ करत भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णपणे दबाव निर्माण केला. सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांत मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे संजय आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगने अप्रतिम ड्रॅग-फ्लिकच्या जोरावर गोलमध्ये रूपांतर करत भारताला २-० ची भक्कम आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा सावध खेळ; २-० ची आघाडी कायम!
दुसऱ्या क्वार्टरमध्ये खेळाचा वेग काहीसा मंदावला आणि दोन्ही संघांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. भारताने मैदानावर ताबा कायम ठेवत आपली आघाडी सुरक्षित ठेवली. या सत्रात भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही, तर वेल्सने केलेल्या एका आक्रमक प्रयत्नात चेंडू थेट साइड-नेटला लागला. त्यामुळे पहिल्या हाफची शिट्टी वाजली तेव्हा टीम इंडियाने २-० ने सामन्यावर आपली मजबूत पकड कायम ठेवली होती.
कर्णधार हरमनप्रीतचा दुसरा गोल; स्कोअर ३-० वर!
Indian Men’s Team opens FIH Hockey World Cup 2026 campaign with 3-1 win over Wales
Sanjay opened the scoring before captain Harmanpreet Singh struck twice from penalty corners to seal a confident victory for India.
India next face England on 19 August in Amstelveen.… pic.twitter.com/ZCUc3WzWx1
— DD News (@DDNewslive) August 15, 2026
मध्यंतरानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये वेल्सने पुनरागमनासाठी जोरदार चढाया केल्या, मात्र भारतीय बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला भारताला पुन्हा एकदा उत्कृष्ट संधी मिळाली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने कोणताही गाफीलपणा न दाखवता वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. ३-० च्या या आघाडीने वेल्सच्या पुनरागमनाच्या सर्व आशांवर पूर्णपणे पाणी फेरले.
विवादित रिव्ह्यूनंतरही वेल्सचा १ गोल; भारताचा दणदणीत विजय!
चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये ५५ व्या मिनिटाला मैदानात एक विचित्र प्रसंग घडला. भारतीय गोलपोस्टजवळ गोंधळ सुरू असताना मैदानावरील पंचांची शिट्टी खाली पडली. पंच शिट्टी उचलण्यात व्यस्त असताना खेळ सुरूच राहिला आणि थर्ड अंपायरच्या रिव्ह्यूनंतर वेल्सच्या सॅम वेल्शचा गोल वैध ठरवण्यात आला. या वादानंतरही भारताने आपला संयम कायम ठेवत वेल्सला ३-१ ने धूळ चारली आणि विश्वचषक स्पर्धेचा विजयी प्रारंभ केला.





