Independence Day: अभ्यास, ज्ञानातून देशाचे नाव उज्ज्वल करा : ॲड. नाईक
Independence Day:

स्वानंद प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात
Independence Day: “आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. इंग्रजांविरुद्ध लढा दिला. कारण, त्या थोर व्यक्तींचे आपल्या देशावर प्रेम होते. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या देशासाठी कार्य करावे. भविष्यात मी माझ्यासाठी काय देऊ शकतो, याचा विचार करावा. आपल्या अभ्यास आणि ज्ञानातून देशाचे नाव उज्ज्वल करा,” असे मार्गदर्शन कायदेतज्ज्ञ ॲड. योगेश नाईक यांनी धायरी येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्यात केले.
स्वानंद प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे ॲड. नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रगीत, राज्यगीत गायनानंतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी “नशामुक्त भारत” अभियानांतर्गत अमली पदार्थ विरोधी शपथ घेतली.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे, मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे, अपर्णा नाईक, दादासाहेब मनोरे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विलास नऱ्हे, सचिव संतोष पवार, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सारिका वाघमारे, शिक्षक प्रतिनिधी वंदना कदम, शाळेचे सचिव अभिषेक मनोरे, सोमशेखर कमतगी यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.
या वेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, विष्णू गणेश पिंगळे, अंगणवाडी संकल्पनेच्या जनक ताराबाई मोडक, चंद्रशेखर आझाद, कल्पना दत्त, थोर वैज्ञानिक सत्येंद्र नाथ बोस, श्यामजी कृष्ण वर्मा, थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांच्या व्यक्तिरेखा सादर केल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर संगीत कवायत सादर केली.
प्रशांत मनोरे यांनी मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले. तसेच शाळेतील इंग्लिश भाषा प्रशिक्षण उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.सहशिक्षिका मोहिनी पिंपळगावकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.





