India Hockey Eliminated : भारतीय हॉकी संघाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले! अर्जेंटिनाविरुद्धच्या पराभवानंतर थेट विश्वचषकातून बाहेर
India Hockey Eliminated : भारतीय हॉकी संघाचे पुन्हा एकदा विश्वविजेते बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

India Knocked Out Of FIH Mens Hockey World Cup 2026 : पुरुष हॉकी विश्वचषक २०२६ (Men’s Hockey World Cup 2026) स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान अखेर संपुष्टात आले आहे. स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या अत्यंत चुरशीच्या आणि करो या मरो लढतीत अर्जेंटिनाने भारताचा ५-३ असा पराभव केला. या पराभवामुळे भारतीय हॉकी संघाचे पुन्हा एकदा विश्वविजेते बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. याआधीच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध ३-१ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर अर्जेंटिनाविरुद्धचा पराभव भारतासाठी स्पर्धेबाहेर जाणारा ठरला.
सामन्याच्या ४०व्या सेकंदालाच गोल; सुरुवातीलाच भारतावर प्रचंड दबाव!
अर्जेंटिनाविरुद्ध सामन्याची सुरुवात भारतासाठी अत्यंत निराशाजनक झाली. खेळ सुरू होताच अवघ्या ४०व्या सेकंदाला तोस्कानीने अप्रतिम मैदानी गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ ७व्या मिनिटाला निकोलस डेला टोरीने पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करून भारतावरील दडपण वाढवले. १०व्या मिनिटाला सुखजीत सिंगने उत्कृष्ट गोल करत सामन्यात २-१ अशी पिछाडी भरून काढली खरी; मात्र भारतीय खेळाडूंना हा वेग आणि समन्वय पुढे टिकवता आला नाही.
सलग चार पेनल्टी कॉर्नर वाया; बचावातील त्रुटींचा बसला मोठा फटका –
The Indian Men’s Team went down 3–5 against Argentina in their last Pool E clash at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026 to bow out of contention for a place in the semi-finals. 🏑
Sukhjeet Singh scored twice, while Hardik Singh added a third goal for India.… pic.twitter.com/6WxztSEBVe
— Hockey India (@TheHockeyIndia) August 24, 2026
सामन्याच्या ३४व्या मिनिटाला भारताला सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. कर्णधार हरमनप्रीत सिंगकडे गोल करण्याचे सुवर्णसंधी असतानाही जुगराज सिंगची अनुपस्थिती आणि अर्जेंटिनाचा भक्कम बचाव यामुळे भारताला एकही गोल करता आला नाही. अखेरच्या सत्रांत अर्जेंटिनाच्या डोमेनेने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत पकड घट्ट केली. भारताचा गोलकीपर मोहितने काही सुंदर बचाव केले आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने दोन गोल नोंदवले; परंतु तोपर्यंत सामना भारताच्या हातातून निसटला होता.
नेदरलँड्सनंतर अर्जेंटिनाकडूनही पराभव; दुसऱ्या फेरीत शून्य गुण!
भारतीय हॉकी संघासाठी विश्वचषकाची दुसरी फेरी पूर्णपणे निराशाजनक ठरली. पहिल्या फेरीत इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारताला दुसऱ्या फेरीसाठी कोणतेही गुण सोबत नेता आले नव्हते. त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध ३-१ आणि आता अर्जेंटिनाविरुद्ध ५-३ अशा सलग दोन पराभवांमुळे दुसऱ्या फेरीत भारतीय संघाला एकाही गुणाची कमाई करता आली नाही. परिणामी भारताचे या विश्वचषकातील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले.





