IND vs BAN 3rd T20 : भारताचा बांगलादेशवर मोठा विजय; तिसऱ्या सामन्यासह मालिकाही 3-0 ने घातली खिशात…

IND vs BAN 3rd T20 Match Highlights : बांगलादेशविरूद्दच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात शनिवारी भारतानं बांगलादेशचा 133 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम खेळताना 297 धावा केल्या होत्या, मात्र प्रत्युत्तरात बांगलादेशला 164 धावाच करता आल्या. यासह टीम इंडियाने बांगलादेशचा तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे.
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात संजू सॅमसन भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला, त्याने 47 चेंडूत 111 धावांची ऐतिहासिक खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक करताना 75 धावा केल्या. भारताच्या विजयी संघाकडून रवी बिश्नोईने 3 आणि मयंक यादवने 2 बळी घेतले.
या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा अवघ्या 4 धावा करून बाद झाला, मात्र त्यानंतर सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच्यात 173 धावांची ऐतिहासिक भागीदारी झाली. सॅमसनने 111 धावा केल्या, तर दुसरीकडे सूर्यकुमारने 75 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रियान पराग यांनी स्फोटक शैलीत अनुक्रमे 47 आणि 34 धावांची खेळी केल्या. बांगलादेशकडून तनझिम हसन साकिबने सर्वाधिक 3 बळी घेतले.
विजयासाठी 298 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेश मैदानात उतरला तेव्हा मयंक यादवने डावाच्या पहिल्याच चेंडूवर परवेझ हुसैन इमॉनला शून्य धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 59 धावसंख्येपर्यंत पाहुण्या संघाचे टॉप-3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. अशा स्थितीत लिटन दास आणि तौहीद हृदय यांच्यात 53 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. लिटनने 25 चेंडूत 42 धावा केल्या, तर तौहीद 65 धावा करून नाबाद परतला. आपल्या टी-20 कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी आलेला महमुदुल्लाही केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
परिस्थिती अशी होती की बांगलादेशने 3 षटकांपूर्वीच सामना गमावला होता कारण त्यांना 18 चेंडूत 160 धावा हव्या होत्या, जे साध्य करणे अशक्य होते. बांगलादेशला आक्रमक फलंदाजीची गरज असताना अखेरच्या 5 षटकांत संघाला केवळ 31 धावा करता आल्या. खराब फलंदाजीमुळे 133 धावांच्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
Bangladesh Tour of India 2024
India 🆚Bangladesh | 3rd T20iMatch Result | India won by 133 runs
PC: BCCI#BCB #Cricket #INDvBAN #T20 pic.twitter.com/8vUxjvE9ev
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 12, 2024
भारताने केले अनेक विक्रम…
रेकॉर्डच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हा सामना भारतासाठी संस्मरणीय ठरला. भारत आता टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्या उभारणारा दुसरा संघ बनला आहे. भारतानं 297 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आता फक्त नेपाळ त्याच्या पुढे आहे, ज्याने मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या.
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणा-कोणाला मिळाली संधी…
तर संजू सॅमसन आता भारतासाठी टी-20 सामन्यात दुसरे सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आत्तापर्यंत, टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा भारतीय विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते.





