India Beat Pakistan : भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत गाठली फायनल! २-३ ने मागे असताना आशिष तानीने ५ मिनिटात फिरवला सामना
India Beat Pakistan : मेन्स अंडर-१८ आशिया चषक हॉकी २०२६ च्या हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा ५-३ असा धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत (फायनल) प्रवेश केला आहे.

India Beat Pakistan Under 18 Hockey Asia Cup 2026 Semifinal : मेन्स अंडर-१८ आशिया चषक हॉकी २०२६ च्या हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा ५-३ असा धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत (फायनल) प्रवेश केला आहे. जपानच्या कावासाकी हेवी इंडस्ट्रीज हॉकी स्टेडियमवर शुक्रवारी (५ जून) खेळल्या गेलेल्या सामन्यातील विजयाचा सर्वात मोठा महानायक आशिष तानी पूर्ती हा ठरला. त्याने पाकिस्तानच्या बलाढ्य बचावाचे अक्षरशः लचके तोडत एकट्याने तब्बल ४ गोल डागले आणि पाकिस्तानच्या विजेतेपदाच्या आशेवर पाणी फेरले. एका क्षणी पिछाडीवर असलेल्या भारतीय वाघांनी जबरदस्त जज्बा दाखवत सामन्याचा नूरच बदलून टाकला.
२-३ अशा पिछाडीनंतर भारताचे ऐतिहासिक पुनरागमन!
सामन्याची सुरुवात अत्यंत वेगवान आणि आक्रमक झाली. पहिल्या क्वार्टरच्या १२ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. पाकिस्तानने यावर रिव्ह्यू घेतला, परंतु पंचांचा निर्णय भारताच्या बाजूने राहिला आणि आशिष तानीने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या अदीलने २७ व्या मिनिटाला गोल करून स्कोर १-१ ने बरोबरीत आणला. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३५ व्या मिनिटाला भारताच्या शाहरूख अलीने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दोनच मिनिटांत पाकिस्तानच्या मुहम्मद फरहानने गोल करत स्कोर २-२ केला. यानंतर ४२ व्या मिनिटाला उजैर अहमदने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत पाकिस्तानला ३-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. या क्षणाला सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकल्याचे दिसत होते.
𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒 𝐓𝐇𝐀𝐓 𝐓𝐎𝐎𝐊 𝐔𝐒 𝐓𝐎 𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 📸🏆
A thrilling comeback, unforgettable celebrations and a victory that will live long in the memory. 🇮🇳🔥
Here are the snapshots from India’s 5-3 win over Pakistan in the Men’s U18 Asia Cup 2026 semi-final.
India… pic.twitter.com/wovntwWNfg
— Hockey India (@TheHockeyIndia) June 5, 2026
आशिष तानीची वादळी ‘हॅटट्रिक’; पाकिस्तानचे पारडे उलटवले!
शेवटच्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आपल्या आक्रमणाची धार एवढी तीव्र केली की पाकिस्तानी खेळाडूंचा थरकाप उडाला. आशिष तानीने प्रथम भारताला ३-३ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ५३ व्या मिनिटाला आपली ‘हॅटट्रिक’ पूर्ण करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे पाकिस्तान प्रचंड दबावाखाली आला. सामना संपायला अवघा काही वेळ शिल्लक असताना आशिषने आपला वैयक्तिक चौथा गोल डागून भारताच्या ५-३ अशा ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
आता शनिवारी (६ जून) याच मैदानावर भारत आणि यजमान जपान यांच्यात विजेतेपदाचा महामुकाबला खेळवला जाणार आहे.





