इंडिया आघाडीच्या खासदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला; श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना टोला

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटल्यानंतर शिवसेना खासदार व एनडीए उमेदवार प्रतिनिधी असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. गांधी यांच्या आवाहनानुसार इंडिया आघाडीच्या खासदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला.
ते म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. तेव्हा त्यांच्या आघाडीच्या खासदारांनी खरोखरच त्यांचे ऐकले! अंतरात्म्याच्या आवाजाला जागून त्यांच्यापैकीच अनेकांनी आपले पहिल्या पसंतीचे मत सी.पी राधाकृष्णन यांच्या पारड्यात टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारवर विश्वास हाच अंतरात्म्याचा आवाज हे विरोधकांना उशीरा का होईना कळू लागलेय.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी यांनी १० वर्ष केलेले काम, ऑपरेशन सिंदूर, केंद्र सरकारची धोरणे यामुळे एनडीए खासदारांबरोबरच विरोधी खासदार देखील प्रभावित झाले. त्यामुळेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या खासदारांनी मतदान केले.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवार प्रतिनिधी म्हणून जबाबदार सांभाळली होती. मतांची जुळवाजुळव आणि विजयी रणनितीमध्ये खासदार डॉ. शिंदे यांचा सहभाग होता. एनडीए उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षाही जास्त मते मिळाल्याने एनडीएची भक्कम एकजूट कायम असल्याचे दिसून आले.





