Aus A vs Ind A 1st unofficial Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘भारत-अ’ ची फलंदाजी ढेपाळली, पहिला डाव 107 धावांवर संपुष्टात…

India A vs Australia A 1st unofficial Test : – भारत अ व ऑस्ट्रेलिया अ दरम्यान सुरु असलेल्या लढतीमध्ये, पहिल्याच दिवशी भारताचा पहिला डाव १०७ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला देखील चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या दिवसअखेर भारताकडे पहिल्या डावातील केवळ ८ धावांची आघाडी शिल्लक आहे.
ब्रेंडन डॉगेटने भेदक गोलंदाजी करताना, भारताचा पहिला डाव ४७.४ षटकांत केवळ १०७ धावांमध्ये संपुष्टात आणला. भारताकडून सर्वाधिक ३६ धावांची खेळी देवदत्त पडीक्कलने केली. साई सुदर्शनने २१ तर नावादीप सैनीने २३ धावांचे योगदान देताना भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील ओलांडता आली नाही. ब्रेंडन डॉगेटने १५ धावांच्या मोबदल्यात ६ भारतीय फलंदाज टिपले. जॉर्डन बकिंगहॅमने २ तर फर्गस ओ’नील व टॉड मर्फीने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात देखील खराब झाली. सलामीवीर सॅम कॉन्स्टास व कॅमेरून बॅनक्रॉफ्ट हे भोपळा ही न फोडता परतल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद ९ अशी झाली होती. त्यानंतर दुसरा सलामीवीर मार्कस हॅरिस देखील १७ धावांचे योगदान देऊन परतला. कर्णधार नॅथन मॅकस्वीनी व ब्यू वेबस्टर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ३३ धावांची खेळी करून वेबस्टर परतला.
त्यानंतर कर्णधार नॅथन मॅकस्वीनी (नाबाद २९) व कूपर कॉनोली (नाबाद १४) यांनी अजून पडझड होवू दिली नाही. दिवसअखेर ऑस्ट्रेलिया संघाने ४ बाद ९९ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडे पहिल्या डावातील ८ धावांची आघाडी शिल्लक आहे. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.





