IND A vs AUS A India A Create history : भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह भारत अ संघाने मालिका विजयास कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवा इतिहास रचला. प्रथमच एखाद्या ‘अ’ संघाने कसोटी क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. यापूर्वी कोणत्याही ‘अ’ संघाला असा पराक्रम करता आला नव्हता. या रेकॉर्डब्रेक पाठलागात केएल राहुल आणि साई सुदर्शन यांच्या शतकी खेळींनी महत्त्वाची भूमिका बजावली. केएल राहुल आणि साई सुदर्शनने झळकावली शतकं – या सामन्यात भारत अ संघासमोर 412 धावांचे आव्हान होते. पाठलागाला सुरुवात करताना भारत अ संघाला केएल राहुल आणि एन. जगदीशन यांनी पहिल्या गड्यासाठी 176 धावांची दमदार भागीदारी करून दिली. जगदीशन 36 धावा काढून बाद झाला, तर केएल राहुल अर्धशतक झळकावून रिटायर्ड हर्ट झाला. दुसऱ्या दिवशी राहुलने पुन्हा फलंदाजी केली आणि 176 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीत 16 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. साई सुदर्शननेही 172 चेंडूंमध्ये 100 धावांची शानदार शतकी खेळी केली. देवदत्त पडिक्कल आणि मानव सुथार प्रत्येकी 5 धावांवर बाद झाले. कर्णधार ध्रुव जुरेलने 66 चेंडूंमध्ये 56 धावांची झटपट खेळी केली, तर नितीश कुमार रेड्डी 16 धावांवर नाबाद राहिला. केएल राहुल शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. हेही वाचा – PAK vs BAN : आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत-पाक पहिल्यांदाच फायनलमध्ये भिडणार, बांगलादेश बाहेर पहिल्या डावात भारत अ संघाची निराशाजनक कामगिरी – या सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात 420 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारत अ संघाचा पहिला डाव 194 धावांवर आटोपला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 226 धावांची आघाडी मिळाली. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 196 धावांवर सर्वबाद केले. यात गुरनूर बरार आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 3-3, तर मोहम्मद सिराज आणि यश ठाकुर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.