IND A vs AUS A : शतकापूर्वी केएल राहुलच्या अचानक मैदान सोडण्याने चाहत्यांमध्ये खळबळ! नेमकं कारण काय?

KL Rahul Suddenly exits field : ऑक्टोबर महिन्यात भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यापूर्वी भारतीय खेळाडू इंडिया ‘अ’ संघाकडून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध खेळत आहेत. या सामन्यात चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुल शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र, अचानक त्याला मैदान सोडावे लागले, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. असं का झालं? जाणून घेऊया.
राहुल-जैस्वाल भारतासाठी देणार सलामी –
भारत-वेस्टइंडीज कसोटी मालिकेत केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल भारतीय डावाची सुरुवात करतील. सध्या केएल राहुल इंडिया ‘अ’ संघाकडून खेळत असून, त्यांनी चौथ्या डावात एन. जगदीशनसह सलामीला फलंदाजी केली. जगदीशन 37 धावांवर बाद झाला, तर राहुलने 92 चेंडूंमध्ये 74 धावा केल्या. यात त्यांनी 9 चौकार मारले. वेस्टइंडीज मालिकेपूर्वी शतक झळकावून आपला फॉर्म दाखवण्याची अपेक्षा राहुलकडून होती, परंतु अचानक तो फिजिओसह मैदानाबाहेर गेले.
KL Rahul walks back retired hurt after a composed innings against Australia A 🏏#INDAvsAUSA #TeamIndia #KLRahul #CricketTwitter pic.twitter.com/m4G6vcNMO3
— InsideSport (@InsideSportIND) September 25, 2025
केएल राहुलच्या प्रकृतीत थोडी बिघाड –
केएल राहुलने मैदान का सोडले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, माध्यमांनुसार, राहुलची प्रकृती थोडी अस्वस्थ झाल्याने त्यांनी मैदान सोडले. याबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे. राहुलच्या जागी आलेला देवदत्त पडिक्कल दोन चेंडूंमध्ये खाते न उघडता शून्यावर बाद झाला. सध्या साई सुदर्शन फलंदाजी करत असून, त्याच्याकडून अपेक्षा कायम आहेत.
केएल राहुलवर कसोटी सलामीची जबाबदारी –
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केएल राहुल कायमस्वरूपी सलामीवीर म्हणून खेळणार आहे. यापूर्वीही राहुलने अनेकदा सलामीवीराची भूमिका बजावली आहे. आगामी वेस्टइंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांनंतर दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येईल आणि कसोटी मालिका खेळेल. दरम्यान, राहुलच्या प्रकृतीबाबत नवीन अपडेट काय येईल आणि तो कधीपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





