अहमदाबाद – सलामीवीर स्मृती मंधानाच्या निर्णायक लढतीतील शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंड विरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. युएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आले होते. भारतीय खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिका जिंकणे आवश्यकच होते. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करताना ही मालिका जिंकून विश्वकरंडक स्पर्धेतील पराभावाची परतफेड केली. तिसऱ्या लढतीत न्यूझीलंड संघाने ४९.५ षटकांत २३२ धावा केल्या होत्या. सलामीवीर स्मृती मंधानाच्या १०० व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद ५९ धावांच्या जोरावर भारताने ४४.२ षटकांत ४ बाद २३६ धावा करताना तिसरा सामना जिंकला. या लढतीत स्मृतीने आठवे शतक झळकावले. आतापर्यंत भारतीय फलंदाज मिताली राजने ७ शतके झळकावली होती. हा विक्रम स्मृतीने मोडताना विक्रमासह संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आम्हाला कोणत्याही स्थितीमध्ये ही मालिका जिंकायचीच होती, यासाठी आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. आम्ही ठरविल्या प्रमाणे आम्ही गोष्टी करू शकलो, याचा निश्चित आनंद आहे. आम्ही खेळताना आमचे १०० टक्के प्रयत्न करत असतो, मात्र कधी कधी विपरीत गोष्टी देखील घडतात, असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने लढतीनंतर बोलताना सांगितले. दुसरा सामना गमाविल्यानंतर आम्ही सर्वच बाबतीत चर्चा केली, त्यामुळेच दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर देखील आम्ही पुनरागमन करू शकलो, असे ती म्हणाली. विजयाचे श्रेय मी स्मृतीला देवू इच्छिते, ती सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करत होती, मात्र त्यानंतर तिने शांतपणे आपली खेळी विकसित केली. खेळपट्टीवर वेळ घालविल्याने तिला स्थिरावता आले व त्यानंतर तिला धावा करता आल्या. आम्ही दोघीनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी करू शकलो, याचा नक्कीच आनंद असल्याचे कौर म्हणाली. IND vs NZ 3rd ODI : मंधानाचे धमाकेदार शतक, तिसऱ्या सामन्यासह टीम इंडियाचा 2-1 ने मालिकेवर कब्जा… सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ बनवायचा आहे.. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताची निराशाजनक कामगिरी होती. क्षेत्ररक्षणात भारतीय संघ वारंवार चुका करत होता. त्यामुळे किमान ३०-४० धावांचा भारतीय संघाला फटका बसत होता. वाढलेल्या धावांचा दबाव फलंदाजानावर येत होता. या संदर्भात बोलताना हरमनप्रीत म्हणाली, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर आमच्यासाठी गेले काही आठवडे खूप कठीण होते. क्षेत्ररक्षणात चुका होत होत्या. मात्र, आम्ही चर्चा करून होणाऱ्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात भारताला सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ बनविण्यासाठी आम्हाला मेहनत करावी ,लागणार असल्याचे तिने सांगितले.