Manchar : प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात बेमुदत उपोषण
Manchar : भीमाशंकर परिसरातील वनसंपदा, जैवविविधता, नैसर्गिक जलस्रोत आणि आदिवासींचे पारंपरिक हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलकांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर परिसराजवळील शिवभूमी सह्याद्री परिसरातील सर्व्हे क्रमांक २३ मधील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्प रद्द करावा,इत्यादी मागण्यासाठी शुक्रवार, दि.३० पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. भीमाशंकर येथील कमळजाई मंदिर प्रांगणात शिवभूमी सह्याद्री बचाव समन्वय समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले.
भीमाशंकर परिसरातील वनसंपदा, जैवविविधता, नैसर्गिक जलस्रोत आणि आदिवासींचे पारंपरिक हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलकांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.शिवभूमी सह्याद्री परिसरातील सर्व्हे क्रमांक २३ मधील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्प रद्द करावा, जंगलतोड आणि गौण खनिज उत्खननासाठी पारंपरिक ग्रामसभेची परवानगी बंधनकारक करावी, बेकायदेशीर जंगलतोडीला जबाबदार अधिकारी व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच गौण खनिजांची तस्करी थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय आदिवासी भागातील धरणांचे पाणी स्थानिकांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांची संमती घेतल्याशिवाय मोठे प्रकल्प राबवू नयेत, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष अशोकराव काळे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देवून पाठींबा दिला.या उपोषणात आदिवासी अनिल तिटकारे, नारायण हिले, शरद ठोकळ, सौरव बांडे आणि विजय बांबळे सहभागी झाले आहेत. आदिवासी बांधव, पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन अशोकराव काळे पाटील यांनी केले आहे.





