Indapur Rain: ‘ये रे ये रे पावसा’ची आर्त हाक! इंदापूरच्या २२ गावांमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
Indapur Rain: इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरात केवळ हलक्या सरी; विहिरी-ओढे कोरडेच असल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची भीती.

Indapur Rain – आषाढ महिना सुरू होऊनही इंदापूर तालुक्यात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. मागील दोन दिवसांपासून बावडा परिसरासह अवर्षणग्रस्त दुष्काळी २२ गावांमध्ये अधूनमधून भुरभूर स्वरूपाचा पाऊस पडत असला, तरी तो केवळ धूळ शांत करणारा ठरत असून शेतीला जीवनदान देणारा ठरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ओठांवर आता पुन्हा एकदा “ये रे ये रे पावसा…” हीच आर्त हाक उमटू लागली आहे.
इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील २२ गावे कायमच पावसाच्या अनिश्चिततेचा सामना करीत आहेत. या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असल्याने येथील शेती मोठ्या प्रमाणावर कालव्याच्या पाण्यावर आणि उपलब्ध मर्यादित जलस्रोतांवर अवलंबून आहे. मागील महिन्यात कालव्याच्या शेतीच्या पाण्याचे आवर्तन पूर्ण क्षमतेने मिळाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांसह डाळिंब, पेरू, केळी आणि इतर फळबागांना मोठ्या आशेने पाणी दिले.
त्या पाण्यावर पिके जोमाने उभी राहिली; मात्र आता त्यांच्या पुढील वाढीसाठी नैसर्गिक पावसाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. वेळेत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांची वाढ खुंटण्याची,उत्पादनात घट होण्याची आणि फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. अवर्षणप्रवण पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात अनेक शेतकरी अत्यंत कमी पाण्यावर आधुनिक पद्धतीने डाळिंब, पेरू आणि केळीच्या बागा जोपासत आहेत.
या बागांच्या संवर्धनासाठी नियमित ओलावा अत्यावश्यक असतो.त्यामुळे सध्या पडणाऱ्या तुरळक सरी शेतकऱ्यांची चिंता कमी करण्याऐवजी अधिकच वाढवत आहेत. बावडा परिसरात दोन दिवसांपासून हलक्या सरी कोसळत असल्या,तरी शेतातील माती भिजेल,विहिरी-ओढे भरतील आणि पिकांना पुरेसा ओलावा मिळेल, इतका पाऊस अद्याप झालेला नाही. परिणामी ग्रामीण भागातील शेतकरी आकाशाकडे आशेने पाहत असून दमदार पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामाचे यश आता पूर्णपणे आगामी पावसावर अवलंबून आहे. वेळेत मुसळधार पाऊस झाला, तर पिकांना नवसंजीवनी मिळेल; अन्यथा दुष्काळी २२ गावांतील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यात सध्या एकच भावना व्यक्त होत आहे – “भुरभूर नको… आता दमदार पाऊसच हवा!”
दुष्काळी २२ गावांची आभाळाकडे आस
इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवागी, रेडा, रेडणी, काटी, सराफवाडी, निमगाव केतकी, दगडवाडी, घोरपडवाडी, लाखेवाडी यांसह दुष्काळी २२ गावांचा पट्टा कायमच कमी पावसामुळे ओळखला जातो. या भागातील बहुतांश शेती कालव्याच्या आवर्तनावर आणि मर्यादित जलस्रोतांवर अवलंबून आहे. मागील महिन्यात मिळालेल्या आवर्तनामुळे खरीप पिकांसह डाळिंब, पेरू, केळी आणि इतर फळबागांना नवसंजीवनी मिळाली; मात्र आता त्यांच्या पुढील वाढीसाठी दमदार पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे.
सध्या पडणारी भुरभूर केवळ वातावरणात गारवा निर्माण करत असून शेतीची तहान भागविण्यास अपुरी ठरत आहे.वेळेत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांची वाढ, फळबागांचे उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे दुष्काळी २२ गावांतील प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर आज एकच आर्त हाक आहे, “भुरभूर नको… आता मुसळधार पाऊसच हवा !”





