Satara News : मुसळधार पावसाने महाबळेश्वर अलर्टवर; नागरिकांना सतर्कतेचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे आवाहन
Satara News : मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे किंवा रस्ते खचण्याचा धोका वाढला असल्याने अशा ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाबळेश्वर: महाबळेश्वर शहरासह संपूर्ण परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच स्थानिक नगरसेवकांनी नागरिक व पर्यटकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ पालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाबळेश्वर नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम (Disaster Management Team) पूर्णपणे सज्ज असून, कोणत्याही संकटाचा त्वरित सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे किंवा रस्ते खचण्याचा धोका वाढला असल्याने अशा ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
घरात पाणी शिरणे, झाड पडणे, रस्ता खचणे किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने महाबळेश्वर नगरपरिषदेच्या ०२१६८-२६०२२० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
महाबळेश्वर पालिका प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी २४ तास सज्ज असल्याचा विश्वास नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.





