Indapur water scarcity: शेतकरी चिंतेत, विहिरी कोरड्या! इंदापूर तालुक्यात पाण्याचे मोठे संकट; उसाचे उत्पादन ५०% घटणार?
Indapur water scarcity: बाजरी, सोयाबीन आणि मका पिके धोक्यात; आगामी १५ दिवसांत पाऊस न झाल्यास ऊस उत्पादनाला मोठा फटका बसण्याची भीती.

Indapur water scarcity – यंदाच्या पावसाळ्यात इंदापूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत सापडले आहेत. जून महिना संपून जुलैही अखेरच्या टप्प्यात असतानाही दमदार पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असून खरीप हंगामासह ऊस पिकांवरही मोठे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अपुर्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी सातत्याने खालावत आहे. अनेक गावांमधील विंधन विहिरी कोरड्या पडल्या असून काही ठिकाणी अत्यल्प पाणी उपलब्ध होत असल्याने त्या काही मिनिटांतच बंद पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. तालुक्यातील ओढे-नाले अद्याप वाहिलेले नाहीत.
पाझर तलाव, तळी आणि अन्य जलसाठे कोरडेच असल्याने भविष्यातील पाणी उपलब्धतेबाबतही चिंता वाढली आहे. दमदार पाऊस झाल्यास जमिनीतील पाणीसाठा वाढून वर्षभर शेती व पिण्याच्या पाण्याचा आधार निर्माण होतो. मात्र यंदा अपेक्षित पर्जन्य न झाल्याने ही शक्यता धूसर झाली आहे. सध्या खरीप हंगामातील बाजरी, तूर, उडीद, मका आणि सोयाबीन ही पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून त्यांना पुरेशा पाण्याची आवश्यकता आहे.
येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक नियोजनावरही विपरीत परिणाम होणार आहे. यंदा कालव्यांद्वारेही शेतीसाठी अपेक्षित पाणी उपलब्ध झाले नाही. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकर्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला होता. धरणातील पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवल्याने शेतीला आवश्यक आवर्तने मिळू शकली नाहीत.
याचा सर्वाधिक फटका इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्यांना बसला असून अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी हिरवा चारा उगवलेला नसल्याने पशुपालकांसमोरही मोठे संकट उभे ठाकले आहे. जनावरांच्या चार्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असून पशुपालन व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या उसालाही सध्या पावसाची नितांत गरज आहे. आणखी पंधरा दिवस दमदार पाऊस झाला नाही, तर आगामी गळप हंगामात उसाच्या उत्पादनात 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सलग दोन महिने अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील हंगामातील ऊस उत्पादनावरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतकर्यांच्या नजरा सतत आकाशाकडे
विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील इतर भागांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असताना इंदापूर तालुक्यात मात्र ढग दाटून येतात आणि काही वेळातच विरून जातात. त्यामुळे ’आता पाऊस पडेल’ या आशेने शेतकर्यांच्या नजरा सतत आकाशाकडे लागून राहत आहेत; मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. एकंदरीत, इंदापूर तालुक्याला सध्या सलग आणि दमदार पावसाची अत्यंत गरज आहे.





