Indapur News : इंदापूर नगरपरिषदेत खळबळ! ‘त्या’ नामनिर्देशित सदस्याच्या धमकीनंतर कर्मचाऱ्यांची पोलिसांत धाव
Indapur News : नामनिर्देशित सदस्याकडून अपमानास्पद वर्तन आणि शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप; इंदापूर नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ.

Indapur News – इंदापूर नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका नामनिर्देशित सदस्याविरोधात धमकी, अपमानास्पद वर्तन आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप करत मुख्याधिकाऱ्यांसह इंदापूर पोलीस ठाण्यातही निवेदन सादर केल्याने नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून निषेध म्हणून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, गुरुवारी (दि. ४) दुपारी नगर अभियंता शिवदत्त भोसले हे सहकारी नितीन जगताप, सुभाष ओहोळ आणि प्रसाद देशमुख यांच्यासमवेत आस्थापना विभागात जेवण करत असताना संबंधित नामनिर्देशित सदस्य तेथे आले. त्यांनी मागितलेली माहिती दहा मिनिटांत उपलब्ध करून न दिल्यास दुसऱ्या दिवशी मोठा जमाव घेऊन येऊन सर्व विभागांचे कामकाज बंद पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यापूर्वीही १३ मे रोजी प्रशासकीय अधिकारी स्वप्नील हाके हे कार्यालयात कर्तव्यावर असताना संबंधित सदस्यांनी नागरिक व काही नगरसेवकांसह कार्यालयात येऊन गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण पथकाबाबत माहिती का देत नाही, या कारणावरून शासकीय कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच मुख्याधिकारी शासकीय बैठकीसाठी बाहेर असताना त्यांच्या दालनाबाहेरील खुर्चीला हार घालण्यात आला होता. यावेळी “आज एका विभागाचा नंबर आहे, उद्या दुसऱ्या विभागाचा असेल,” अशा स्वरूपाची वक्तव्ये करत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. नगरपरिषदेच्या विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणावर माहितीची मागणी होत असताना कर्मचारी एसआयआर,
जनगणना, विविध शासकीय योजना आणि नियमित प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यामुळे सर्व माहिती तत्काळ उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सदर प्रकारांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून नगरपरिषद प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित सदस्यावर तातडीने कारवाई करावी, वरिष्ठ प्रशासनाला अहवाल पाठवावा आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगर अभियंता शिवदत्त भोसले, प्रशासकीय अधिकारी स्वप्नील हाके, लेखापाल तथा इंदापूर नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विवेकानंद बिराजदार यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास विभाग, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय तसेच इंदापूर पोलीस ठाण्यासह विविध वरिष्ठ कार्यालयांना पाठविण्यात आल्या आहेत.






