Indapur News: नद्या तुडुंब पण २२ दुष्काळी गावे तहानलेलीच! इंदापूर तालुक्यातील तलाव कोरडे; बळीराजा आक्रमक
Indapur News: केवळ कालव्याच्या आवर्तनाने प्रश्न सुटणार नाही; वाघाळा, तरंगवाडी, वरकुटे अन् रेडणी तलाव भरण्याची शेतकऱ्यांची मागणी.

Indapur News – ऑगस्ट महिना सुरू झाला, तरी इंदापूर तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाकडून २२ दुष्काळी गावांसाठी सुरू असलेल्या आवर्तनामुळे कालव्याचे पाणी शेतांपर्यंत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असला,
तरी दीर्घकालीन जलसुरक्षेचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. तालुक्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा व भीमा नद्यांमधूनही पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र दुसरीकडे २२ दुष्काळी गावांच्या जीवनवाहिनी ठरणारे शेटफळ हवेली तलाव, तरंगवाडी तलाव, वाघाळा तलाव, वरकुटे तलाव तसेच रेडणी येथील जुना तलाव अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, केवळ नद्यांमधून पाणी वाहून देऊन प्रश्न सुटणार नाही. उलट या भागातील तलाव भरल्यास हजारो एकर शेतीला वर्षभर सिंचनाचा आधार मिळेल. भूजल पातळी वाढेल, विहिरी व बोअरवेलना पाणी टिकेल आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे शास्त्रीय नियोजन करून दुष्काळी भागातील तलाव तातडीने भरावेत, अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे.
दोन नद्या… तरी पाण्यासाठी संघर्ष
नीरा आणि भीमा या दोन नद्यांचे वरदान लाभलेल्या तालुक्यात आजही अनेक गावांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे. ही वस्तुस्थिती तालुक्याच्या जलनियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. धरणे भरलेली असताना आणि नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतानाही दुष्काळी भागातील तलाव कोरडे राहणे ही शेतकऱ्यांसाठी वेदनादायी बाब ठरत आहे. यंदा पावसाने साथ दिली नाही, तर आगामी रब्बी हंगामासह उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जलप्रश्नासाठी आयुष्य झिजविणाऱ्या नेत्यांची आठवण
२२ दुष्काळी गावांच्या पाणीप्रश्नासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे निमसाखर येथील ज्येष्ठ जलतज्ज्ञ कै. सूर्यकांत रणवरे पाटील यांचे कार्य आजही परिसरातील शेतकरी कृतज्ञतेने स्मरतात. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा अभ्यास, कालव्यांचे नियोजन, तलावांची क्षमता आणि सिंचन व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.
त्याचप्रमाणे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती कै. विश्वासराव रणसिंग यांनीही २२ दुष्काळी गावांच्या पाणीप्रश्नासाठी व्यापक जनआंदोलन उभारले. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत या भागाला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. मात्र या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी पाहिलेले स्वप्न आजही पूर्णत्वास आलेले नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.






